Ticker

6/recent/ticker-posts

वीज ग्राहकांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या (CGRF) यंत्रणेचा लाभ घ्यावा – ॲड. सुरेंद्र सोनवणे



सीजीआरएफ. सदस्य ॲड. सुरेंद्र सोनवणे यांची ग्राहक पंचायत महाराष्ट्र, अहिल्यानगर कार्यालयाला सदिच्छा भेट

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अहिल्यानगर :- : महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगांतर्गत कार्यरत ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच (CGRF) ही वीज ग्राहकांच्या तक्रारींच्या जलद, सुलभ व प्रभावी निवारणासाठी स्थापन करण्यात आलेली स्वतंत्र यंत्रणा असून, वीज ग्राहकांनी या मंचाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन वीज ग्राहक तक्रार निवारण मंच अहिल्यानगरचे सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक विभागाचे सचिव ॲड. सुरेंद्र सोनवणे यांनी केले.
    महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर येथे आले असता ॲड. सोनवणे यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना ॲड. सोनवणे म्हणाले की, पूर्वी महाराष्ट्रात केवळ  झोननिहाय ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यरत होते. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आपल्या तक्रारींच्या सुनावणीसाठी नाशिक झोन कार्यालयात जावे लागत होते. मात्र, महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने ग्राहकांच्या सोयीचा विचार करून १ ऑगस्ट २०२५ पासून प्रत्येक महावितरण सर्कलनिहाय स्वतंत्र ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अहिल्यानगर येथेही स्वतंत्र ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापना झाली असून त्याचे कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील वीज ग्राहकांना त्यांच्या तक्रारींसाठी स्थानिक स्तरावरच न्याय मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेचा सर्व ग्राहकांनी अवश्य लाभ घ्यावा.
ते पुढे म्हणाले की, वीज ग्राहकांनी प्रथम महावितरणकडे तक्रार नोंदवूनही समाधानकारक निवारण न झाल्यास ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे ऑनलाइन पद्धतीने तक्रार दाखल करता येते. या प्रक्रियेसाठी ग्राहकांना कोणत्याही वकिलाची आवश्यकता नसून, ग्राहक स्वतः आपली बाजू मांडू शकतो. त्यामुळे या यंत्रणेबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक असून ग्राहक पंचायत महाराष्ट्रने ही माहिती प्रत्येक वीज ग्राहकापर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी आवाहन केले.
यानंतर ॲड. सोनवणे यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यालयाची पाहणी केली. ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक चळवळ व ग्राहक हिताशी संबंधित विविध विषयांवरील संदर्भग्रंथ आणि साहित्य ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष श्री. गजेंद्र क्षीरसागर यांनी उपस्थितांचे स्वागत करून जिल्हा शाखेचा वार्षिक अहवाल सादर केला. ग्राहक तक्रार निवारण मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख तथा जिल्हा सचिव ॲड. सिद्धार्थ वाघमारे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
यावेळी झालेल्या चर्चासत्रात महापालिकेचे माजी सहआयुक्त संजीव परशरामी, माजी नायब तहसीलदार सर्वोत्तम क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय सोनार, जिल्हा संघटिका शलाका रसाळ, स्वाती ठाकूर, कोषाध्यक्ष कृष्णा बागडे, ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनचे जिल्हा संचालक अमित काळे, संजय जोशी, रवी सातपुते, भालेराव आदी उपस्थित होते.
---------------------
छायाचित्र ओळ :-
ग्राहक पंचायत महाराष्ट्र, अहिल्यानगर जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत वीज ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF), अहिल्यानगरचे सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक विभागाचे सचिव ॲड. सुरेंद्र सोनवणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या