•SIR व जनगणनेला सन्मानजनक मानधन, ई-पीक पाहणीला मात्र तुटपुंजे मानधन; शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी (श.प्र.) :-लाखनी तालुक्यातील पिंपळगाव महसूल मंडळातील सर्वात दुर्गम आणि घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले गाव म्हणजे निलागोंदी. याच गावात एका सामान्य ग्रामरोजगार सहाय्यकाने जे करून दाखवले आहे, त्याची चर्चा आज संपूर्ण लाखनी तालुक्यात होत आहे.तहसील कार्यालय, लाखनी यांनी मोरगाव साझा अंतर्गत येणाऱ्या निलागोंदी गावाची खरीप हंगामाची ई-पीक पाहणीची जबाबदारी ग्रामरोजगार सहाय्यक श्री. खुशाल भुरे यांच्यावर सोपवली होती. हे आव्हान सोपे नव्हते. गावात एकूण 360 गट आणि पावसाळ्याचे दिवस. मात्र भुरे यांनी हे आव्हान केवळ स्वीकारलेच नाही तर रात्रंदिवस एक करून 100 टक्के पीक पाहणी पूर्ण करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
तलाठी निशांत नेवारे यांची मोलाची साथ
या संपूर्ण 100 टक्के पीक पाहणीच्या यशामागे मोरगाव साझाचे कर्तव्यदक्ष तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी श्री. निशांत नेवारे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठबळ आहे.निलागोंदी सारख्या दुर्गम गावात 360 गटांची पीक पाहणी करणे हे मोठे आव्हान होते. ॲप हँग होणे, सर्व्हर डाऊन होणे, लोकेशन न मिळणे, फोटो अपलोड न होणे अशा अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. अशावेळी ग्राम महसूल अधिकारी निशांत नेवारे यांनी रात्री-अपरात्री फोनवर, व्हॉट्सॲपवर सतत संपर्कात राहून मार्गदर्शन केले.गट नकाशे समजावून सांगणे, पीक पेरा कसा भरायचा, दुबार पेरा, पडीक जमीन, फळबाग नोंदी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. पावसामुळे शेतात जाता येत नसताना काळजी घ्या, हळूहळू करा पण अचूक करा असा धीर त्यांनी दिला. प्रशासकीय कामाचा ताण असतानाही त्यांनी एकाही शेतकऱ्याची तक्रार येऊ दिली नाही आणि पीक पाहणी सहाय्यकाला एकटे सोडले नाही.
आवाहन करूनही एकही शेतकरी बांधावर नाही - धक्कादायक वास्तव
सहाय्यकाकडून व्हॉट्सॲप ग्रुप, सोशल मीडियामार्फत प्रचार-प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांना आपल्या शेतात पीक पाहणीसाठी हजर राहण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते. मात्र धक्कादायक बाब म्हणजे एकही शेतकरी आपल्या बांधावर आला नाही. "हे काम फक्त सहाय्यकाचेच आहे सहाय्यकच जातील" या चुकीच्या मानसिकतेमुळे संपूर्ण 360 गटांची पाहणी एकट्या खुशाल भुरे यांनाच करावी लागली.
बांधावर मृत्यूशी झुंज हा थरार अंगावर काटा आणणारा
निलागोंदीतील ही पीक पाहणी करणे म्हणजे एखाद्याला दिलेली जबाबदारी ही नोकरी नव्हती तर जीवघेणा प्रवास होता. शेताच्या अरुंद बांधावरून जात असताना दोन वेगवेगळ्या घटनेत मोठ्याने वाढलेल्या गवतातून फणा काढलेला विषारी कोब्रा नाग समोर आला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे अनर्थ टळला. तसेच एका दाट झाडी असलेल्या शेतात रानटी डुकराने त्यांच्या अंगावर धाव घेतली. प्रसंगावधान राखून झाडाचा आडोसा घेतल्याने ते थोडक्यात बचावले. पीक पाहणी दरम्यान जंगलालगतच्या शेतात वाघाचे ताजे पगमार्क (ठसे) आढळले. प्रत्येक पाऊल टाकताना वाघाच्या दहशतीत काम करावे लागले. तसेच वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेताभोवती लावलेल्या सौम्य विद्युत प्रवाहाच्या तारांमधून जीव मुठीत धरून जावे लागले.
ना रेनकोट, ना गमबूट, ना विमा - तरीही कर्तव्य पूर्ण
सर्वात संतापजनक बाब म्हणजे प्रशासनाकडून या धोकादायक कामासाठी रेनकोट, गमबूट, पॉवर बँक, इंटरनेट भत्ता किंवा वाहतूक भत्ता अशी कोणतीही सुविधा पुरवली गेली नाही. मुसळधार पाऊस, चिखलाने भरलेले बांध, ओसंडून वाहणारे नाले यातून वाट काढत दिवसा शेतात जिओ टॅगिंग करणे आणि रात्री घरी येऊन फोटो अपलोड करणे, अशी दिवसाची रात्र करून त्यांनी हे काम पूर्ण केले.
शासनाची दुटप्पी भूमिका - SIR ला मानधन, पीक पाहणीला थट्टा!
SIR (मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण) आणि जनगणना करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सन्मानजनक मानधन दिले जाते, मात्र शेतात जाऊन जीव धोक्यात घालून पीक पाहणी करणाऱ्या सहाय्यकांना अत्यल्प व तुटपुंजे मानधन दिले जाते. ही शासनाची थट्टा असून सुधारित मानधन देण्याची गरज आहे.
ग्रामस्थांची आर्त हाक - विमा कवच द्या
अशा परिस्थितीत काम करणाऱ्या सहाय्यकांचा 50 लाख रुपयांचा अपघात विमा काढावा व त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा योजना लागू करावी. तसेच 100 टक्के पीक पाहणी पूर्ण करणाऱ्या सहाय्यकांचा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विशेष सन्मान करावा, अशी जोरदार मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केली आहे. या घटनेने शासनाच्या ई-पीक पाहणी योजनेतील सहाय्यकांच्या व्यथा आणि त्यांच्या जीवघेण्या कामाची विदारक कहाणी समोर आली आहे.


0 टिप्पण्या