Ticker

6/recent/ticker-posts

नगर पालिकेचा प्रताप: 30 वर्षे जुनी झाडे बेकायदा तोडली

वृक्ष संवर्धन समितीच्या परवानगीशिवाय नगरसेवकांच्या उपस्थितीत कत्तल


 स्थानिक नागरिक व पर्यावरणवाद्यांकडून कारवाईची मागणी

भद्रावती प्रतिनिधी : राजेश येसेकर  

भद्रावती : नगर पालिका क्षेत्रात मनमानी कारभाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. नगरपालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीची कोणतीही परवानगी न घेता आणि कोणाचीही तक्रार नसताना नागमंदिर ते विंजासन रोड वरील 25 ते 30 वर्षे जुनी कडुलिंब व करंजी ची झाडे प्रभागातील नगरसेवकांच्या उपस्थितीत बेकायदेशीरपणे तोडण्यात आली आहेत.
सदर झाडे तोडताना वृक्ष संवर्धन समितीचा कोणताही ठराव नव्हता. कोणत्याही नागरिकांना त्या झाडांचा त्रासही नव्हता. विशेष म्हणजे ज्या प्रभागातील झाडे तोडली तेथील नगरसेवक स्वतः वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य आहेत.

ठेकेदाराच्या माणसांना याबाबत विचारले असता, "झाड तोडण्याचा आमच्याकडे कोणताही लेखी आदेश नाही. नगरसेवकांनी सांगितल्याने आम्ही झाडे तोडली. नकार दिल्यानंतरही जबरदस्तीने तोडण्यास सांगितले" असे उत्तर त्यांनी दिले.

या प्रकरणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता "ठेकेदारावर कारवाई करणार" असल्याचे सांगितले जात आहे. 

मात्र यावर स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, "जर ठेकेदारावर कारवाई होणार असेल तर झाड तोडण्याचा आदेश देणाऱ्या जबाबदार नगरसेवकांवर कारवाई का होणार नाही?" 
एखाद्या सामान्य नागरिकाने झाड तोडल्यास त्याच्यावर थेट कारवाई होते, मग लोकप्रतिनिधींना सूट का?
या बेकायदा झाडतोडणीसाठी जबाबदार नगरसेवकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक व पर्यावरणवादी संघटनांनी भद्रावती नगरपालिकेचे मुख्याधिकारी व  जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.

सध्या भद्रावती नगर पालिकेचा कारभार मनमानी व मनमर्जी प्रमाणे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

----------------------------------------------
भद्रावती नगर पालिकेवर झाडे तोडल्याचा आरोप

नागमंदिर-विंजसन रोडवरील 30 वर्षे जुनी झाडे वृक्ष समितीच्या परवानगीशिवाय तोडली. ठेकेदाराने नगरसेवकांच्या सांगण्यावरून तोडल्याचे सांगितले. नागरिकांनी मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या