20 वर्षात फक्त ₹1500 वाढ, अजूनही ₹2500 मानधनावर कुटुंब कसे चालवायचे?
चंद्रपूर प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर : शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक तर्फे राज्यभरातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी रविवार, 9 ऑगस्ट 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्यावर राज्यव्यापी दे धडक महामोर्चा काढण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून हजारो कर्मचारी या मोर्चात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाचे प्रतिनिधित्व कॉम्रेड राजू गैनवार, माजी नगरसेवक व जिल्हा संघटक आयटक करणार आहेत.
शालेय पोषण आहार योजनेसाठी केंद्राचा 60% व राज्याचा 40% वाटा आहे. 2002 पासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला प्रति विद्यार्थी 50 पैसे प्रमाणे मोबदला मिळत होता. आयटकच्या लढ्यामुळे 2011 मध्ये केंद्राने ₹1000 मानधन वाढ दिली. 2018 मध्ये राज्याने ₹500 व 2023 मध्ये ₹1000 वाढ केली.
मात्र आजही राज्यातील 1,73,000 महिला व पुरुष स्वयंपाकी-मदतनीस यांना फक्त ₹2500 मानधन मिळत आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वी राज्य सरकारने जाहीर केलेली ₹1000 मानधन वाढ अद्याप अंमलात आली नाही. 5 जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा वाढीची घोषणा झाली, पण अंमलबजावणी शून्य.
कॉम्रेड विनोद झोडगे पाटील, राज्य सरचिटणीस आयटक यांनी इशारा देताना सांगितले, _"2011 नंतर केंद्र सरकारने एक रुपयाचीही वाढ केली नाही. कर्मचाऱ्यांना ठेंगा दाखवण्याचे काम केले. प्रचंड महागाईत ₹2500 मध्ये कुटुंब कसे चालवायचे? मुलांना शिक्षण कसे द्यायचे?"_
आयटकने सरकारकडे खालील मागण्या केल्या आहेत किमान ₹26,000 वेतन लागू करावे, कायम स्वरूपी नियुक्ती व सेवा संरक्षण द्यावे, पेन्शन योजना लागू करावी, ₹10 लाख अपघात विमा घोषित करावा, वार्षिक 12 रजा मंजूर कराव्यात, ड्रेस कोड, आयडी कार्ड व कायम ऑर्डर द्यावी.
शाळा उघडणे, बंद करणे, स्वयंपाक, वाढणे, साफसफाईसह विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे काम हे कर्मचारी करतात. सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास 9 ऑगस्टला मुख्यमंत्री निवासस्थानावर धडक मोर्चा होणार असल्याचे युनियनने स्पष्ट केले आहे.
---------------------------------------------------
पोषण आहार कर्मचाऱ्यांचा 9 ऑगस्टला नागपूर घेराव
*₹2500 मानधनात जगणे अशक्य. ₹1000 वाढीची घोषणा कागदावरच. 1.73 लाख कर्मचाऱ्यांचा आयटकच्या नेतृत्वात सीएम बंगल्यावर महामोर्चा. ₹26,000 वेतन व कायम नोकरीची मागणी.


0 टिप्पण्या