Ticker

6/recent/ticker-posts

साकोली-नागझिरा रस्ता दुरुस्ती करिता विद्यार्थीच उतरणार रस्त्यांवर



 जंतरमंतरचे चित्र नागझिरा रस्त्यावर अपेक्षित 

 अनेक विद्यार्थ्यांसह पालक जखमी 
     

रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 

साकोली:  साकोली-नागझिरा व्याघ्र प्रकल्प रस्ता सध्या अपघातग्रस्त प्रवण स्थळ ठरलेले आहे. अनेक दिवसांपासून या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांसह अनेक पालक जखमी झालेली आहेत. त्यामुळे या रस्त्याची त्वरित डागडूजी न झाल्यास रस्त्याच्या दुरुस्ती करिता पालकांसह विद्यार्थी, शिक्षक रस्त्यावर उतरण्याचा इशारा आता शाळा महाविद्यालयांनी दिलेला आहे. सदर रस्ता ६ गावांशी जोडलेला असून या रस्त्यावर पालक शिक्षकांसह किमान ६ ते ७ हजार विद्यार्थी रोज या रस्त्यावरून विद्यार्जनकरिता आवागमन करीत असतात. मात्र अनेक दिवसापासून प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढण्यासाठी आता विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागत असल्याने दिल्लीतील जंतर मंतरचे चित्र या रस्त्यावर काही दिवसात दिसल्यास नवल नाही. सविस्तर प्राप्त केलेल्या माहितीनुसार, सध्या पावसाळा सुरू आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. असाच प्रकार सध्या नागझिरा अभयारण्य रोडवर दिसून येत आहे. सध्या या रस्त्यावर पडलेले खड्डे विद्यार्थी आणि पालकांसाठी जीवघेणे ठरू लागलेले आहेत. अनेक दिवसापासून हे खड्डे जीवघेणे ठरत असतांना याकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. नागझिरा व्याघ्र प्रकल्प अभयारण्य हा साकोलीतील सर्वाधिक रहदारीचा रस्ता आहे. जमनापूर, पिटेझरी, वडेगाव, खांबा, जांभळी, तुडमापुरी ही मुख्य गावे साकोलीतील प्रमुख रस्त्याशी जोडलेली आहेत. सदर गावातील नागरिक या मुख्य रस्त्याने तालुक्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी रोज येत असतात. विशेष म्हणजे या रस्त्यावर व्यावसायिक दुकानांसह शाळा, महाविद्यालय परिसर आहे.
या रस्त्यावरून रोज ७ हजारच्या जवळपास विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेली आहेत. या खड्ड्यातून सर्वांना आपली वाहने काढावी लागतात. खड्ड्यात पाणी भरल्यावर खड्डा दिसून येत नाही. त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळतात. सध्या या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात होत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खडके पडल्याने अनेक विद्यार्थी पालक शिक्षक जखमी झालेले आहेत तर वाहनांचे छोटे मोठे नुकसान होत आहे.
---------------------------------------------- 

संबंधित यंत्रणेत काम करणाऱ्यांवर प्रहार करणे आवश्यक झालेले आहे. हा रस्ता नागझिरा व्याघ्र प्रकल्प अभयारण्याकडे जाणारा असला तरीही हा रस्ता शाळा महाविद्यालय परिसराचा आहे. या रस्त्याशी अनेक गावे जोडलेली आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून रोज जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. अनेक दिवसांपासून हा रस्ता उखडलेला आहे. ठिकठिकाणी मोठमोठे भगदाड पडलेली आहेत. असे असतांना संबंधित रस्ता दुरुस्तीची यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असेल तर यांनी गेंड्याची कातडी पांघरली असे म्हणता येईल. या रस्त्यांवर हजारो विद्यार्थ्यांच्या जीवन मृत्यूचा खेळ सुरू असताना ही यंत्रणा झोपेत कशी ? त्यामुळे या यंत्रणेवर आम्ही प्रहार करणार आहोत. या आठवड्यापर्यंत  या रस्त्याची डागडूजी झाली नाही तर हजारो विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही हा रस्ता अडवणार आहोत. ताकत असेल तर प्रशासनाने आंदोलनापासून आम्हाला अडवून दाखवावे किंवा झक मारून हा रस्ता दुरुस्त करून दाखवावे.

कैलास गेडाम, जांभळी ( सडक )
जिल्हा महासचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम
______________________________________________

माझ्या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम त्वरित करण्यासाठी सभेमध्ये ठराव घेणार आहे. परंतु वैनगंगा शैक्षणिक परिसरापासून ते साकोली हा रस्ता माझ्या हद्दीत येत नाही. तो रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी साकोली प्रशासनाची आहे. तेथील प्रशासनाने यावर लक्ष केंद्रित करावे. हे मात्र खरं की या रस्त्याची दुरुस्ती आवश्यक झालेली आहे. अन्यथा हा रस्ता एखाद्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. या रस्त्याने मला सुद्धा रोज जावे यावे लागते.

पूजा देशमुख,
सरपंच जमनापूर.
______________________________________________

मी माझ्या पाल्यासह या शैक्षणिक परिसरात रोज ये जा करीत असतो. हा रस्ता उखडलेला आहे. अनेक दिवसापासून हा रस्ता उघडलेला असतानाही प्रशासनाला का दिसत नाही ? कुणाचा जीव जाण्याची वाट प्रशासन बघत आहे ? हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा. अन्यथा पालक म्हणून मी रस्त्यावर आंदोलनासाठी ठामपणे उभा राहणार आहे.

भावेश कोटांगले.
पालक, साकोली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या