Ticker

6/recent/ticker-posts

बाजारातील कर्णकर्कश आवाजाला आवरणार कोण ?

           विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-रविवार आठवडी बाजार हा साकोली-सेंदुरवाफा नगर परिषद अंतर्गत येणारा आठवडी बाजार. मात्र या बाजारात अलीकडच्या काही दिवसांत भाजी विक्रेत्यांच्या कर्णकर्कश ( ध्वनिक्षेपण यंत्र ) आवाजाने नागरिकांना कमालीचा त्रास होऊ लागलेला आहे. त्यामुळे आठवडी बाजारातील कर्णकर्कश आवाजाला आवरणार कोण ? असा प्रश्न या निमित्ताने समोर आला असून कर्णकर्कश  आवाजावर नियंत्रण ठेवण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, एकोडी फाटा आणि जुना आठवडी बाजार या ठिकाणी रविवार या दिवशी आठवडी बाजार भरीत असतो. तालुक्याच्या ठिकाणी बाजार असल्याने तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने विविध वस्तूंच्या खरेदी करिता येत असतात. सदर बाजार एकोडी फाट्यापासून ते प्रगती कॉलनी  पर्यंत किंबहुना त्याही पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने लावतात. सदर बाजार साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद अंतर्गत येत आहे. बाजार कंत्राटाच्या व्यक्तिमार्फत विक्रेत्यांकडून करही वसूल केला जातो. परंतु आपपल्या दुकानातून अधिकाअधिक वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्या ध्वनिषेपण यंत्राचा आवाज मोठ्याने करीत असतात. या ध्वनिक्षेपण यंत्राच्या माध्यमातून निघणाऱ्या कर्णकर्कश आवाजाचा जोरदार धसका ग्राहकांनी घेतलेला आहे. यामुळे अनेकांना कानाचा त्रास होऊ लागला आहे. दुसरीकडे वाहन चालवितांना लक्ष विचलित होत आहे. एकीकडे अपघात आणि दुसरीकडे कर्णबधीर आजार अशा दोन्ही समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. आठवडी बाजारात ध्वनीक्षेपण यंत्राचा आवाज करणाऱ्या विक्रेत्यांवर नगरपरिषद प्रशासनाने पुढील आठवड्यात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
-----------------------------------------------

मागील काही महिन्यांपासून साकोली आठवडी बाजारच्या दिवशी कटकवार रोड, विशेषतः नागझिरा रोड चौक येथे हातठेले दुकानदार आपल्या वस्तू विक्रीसाठी चारही बाजूने ध्वनिक्षेपण यंत्राच्या माध्यमातून आवाज करीत असतात. त्यामुळे वाहन चालवितांना लक्ष विचलित होऊन अपघात होत आहेत. या माध्यमातून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या हातठेले दुकानदाराविरुद्ध स्थानिक प्रतिनिधी साकोली नगरपरिषद प्रशासनाकडे कारवाईची मागणी करणार काय ?

एम.एस. खवसकर.
सेवानिवृत्त नायब तहसीलदार. साकोली 
-----------------------------------------------

आठवडी बाजारात सर्व दुकानदारांना आपला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. त्याकरिता काही नियम आणि अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. परंतु आठवडी बाजाराच्या दिवशी चारचाकी वस्तू विक्रेते ध्वनिक्षेपण यंत्राचा आवाज नागरिकाच्या माथी मारत असल्याचा प्रकार नागरिकांनी लक्षात आणून दिलेला आहे. यामुळे लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत या आवाजामुळे कर्णपटलाचे आजार निर्माण झाल्याच्या तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. निश्चितपणे पुढील आठवड्यात अशा दुकानदाराच्या विरोधात नगरपरिषद प्रशासन कठोर पाऊल उचलेल.
 
देवश्री मनीष कापगते. 
नगराध्यक्ष

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या