Ticker

6/recent/ticker-posts

मुंडीपार येथे भक्तिमय वातावरणात कावळ यात्रा

‘बोल बम बम’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर; शिवभक्तांसह बालगोपाल व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग


चित्रा न्युज प्रतिनिधी 
गोरेगांव :-परम पूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्त समिती, मुंडीपार यांच्या वतीने श्रावण महिन्याच्या पावन पर्वानिमित्त आज सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात कावळ यात्रेचे आयोजन करण्यात आले.
मुंडीपार बाजार चौक स्थित शिवमंदिरातून कावळ यात्रेला सुरुवात करण्यात आली. शिवभक्तांनी हिरडामाली–पोंगेझरा येथून पवित्र जल आणून ते मुंडीपार येथील शिवमंदिरात आणले. त्यानंतर या पवित्र जलाने शिवलिंगाचा विधिवत अभिषेक करण्यात आला. यावेळी हर हर महादेव आणि ‘बोल बम बम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
कावळ यात्रेत लहान बालगोपालांपासून युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच गावातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगवे व पिवळे वस्त्र परिधान केलेले भाविक, सजविलेले कावळ आणि हातात घेतलेले भगवे ध्वज यामुळे यात्रेचे दृश्य अत्यंत मनोहारी व भक्तिमय झाले होते. शिवनामाचा जयघोष, भक्तीची ऊर्जा आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे मुंडीपार नगरीत जणू शिवभक्तीची लाटच उसळली होती.
या यात्रेच्या माध्यमातून गावातील नागरिकांमध्ये एकता, भक्ती, संस्कार आणि सामाजिक सलोखा यांचा संदेशही अधोरेखित झाला. विशेष म्हणजे बालगोपालांचा सहभाग लक्षवेधी ठरला. लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने कावळ यात्रेत सहभाग घेत भगवान महादेवाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.
कावळ यात्रा यशस्वी करण्यासाठी परम पूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्त समिती, मुंडीपारचे सर्व सदस्य, शिवभक्त, ग्रामस्थ आणि बालगोपालांनी विशेष सहकार्य केले. यात्रेच्या समारोपानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या श्रद्धेने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्रावणातील या पवित्र कावळ यात्रेमुळे मुंडीपारमध्ये दिवसभर ‘हर हर महादेव’, ‘बोल बम बम’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम घडवून आणणारी ही कावळ यात्रा ग्रामस्थांच्या स्मरणात राहणारी ठरली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या