Ticker

6/recent/ticker-posts

मूल येथे सफाई कंत्राटी कामगारांचे एल्गार: मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू!


प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर

चंद्रपूर : मूल नगर परिषदेतील कंत्राटी सफाई कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. 
गेल्या ८ ते १० वर्षांपासून सातत्याने आणि निष्ठेने सेवा बजावूनही पगारवाढ न मिळाल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून, प्रशासनाविरोधात जोरदार पवित्रा घेतला आहे.
या आंदोलनात नगर परिषदेतील सुमारे २२ हून अधिक सफाई कामगारांनी सहभाग नोंदवला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहर स्वच्छ ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पेलणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. वाढत्या महागाईच्या काळात कामगारांना आपले कुटुंब चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे, अशी त्यांची मुख्य मागणी आहे.
कामगारांनी प्रशासनासमोर मांडलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, ८ ते १० वर्षे सेवा देऊनही त्यांना अद्याप पगारवाढ देण्यात आलेली नाही. तसेच कोणत्याही सफाई कामगाराला विनाकारण किंवा गैरव्यवहार करून कामावरून काढून टाकण्यात येऊ नये. जोपर्यंत सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे 'काम बंद' आंदोलन असेच सुरू राहील, असा ठाम इशारा कामगारांच्या वतीने देण्यात आला आहे. याशिवाय, सर्व मागण्या मंजूर झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रीतसर लेखी स्वरूपात शिक्का व सहीनिशी आश्वासन मिळावे, अशीही अट त्यांनी घातली आहे.
अचानक सुरू झालेल्या या काम बंद आंदोलनामुळे मूल शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कचरा संकलन आणि रस्ते सफाईचे काम ठप्प झाल्याने प्रशासनाची अडचण वाढली आहे. या गंभीर समस्येवर नगर परिषद प्रशासन काय तोडगा काढते आणि सफाई कर्मचाऱ्यांना कधी न्याय मिळतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.  
विशेष म्हणजे या संपाकडे लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष पुरवावे.अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या