35 गोवंशांची सुटका, ₹22.35 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 आरोपी अटकेत*
चंद्रपूर प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), चंद्रपूर यांनी गुप्त माहितीच्या आधारे भद्रावती परिसरात गोवंशांची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई करत 35 गोवंशांची सुटका केली. या कारवाईत ₹22.35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 2 आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 4 ऑगस्ट 2026 रोजी एलसीबीला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पडोली पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी करण्यात आली होती.
यावेळी MH-31/CV-0817 क्रमांकाचा 10 चाकी टाटा ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रक न थांबवता भद्रावतीच्या दिशेने वेगाने पळ काढला.
त्यानंतर एलसीबीच्या पथकाने तात्काळ पाठलाग करून सब स्टेशन, पावर ग्रीड, जुना सुमठाणा, भद्रावती येथे ट्रक ताब्यात घेतला.
तपासणीदरम्यान ट्रकमध्ये 31 गायी व 4 बैल असे एकूण 35 गोवंश कोंबून अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान चालक व क्लिनरला ताब्यात घेण्यात आले भुषण ओमकार तरारे - वय 24, रा. आजादनगर, कामठी, नागपूर, सैय्यद जसीन सैय्यद असलम - वय 33, रा. ताजबाग चौक, नागपूर आणि राकेशकुमार यादवराम टेकाम व मोसिन हे दोन आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
सदर कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये - 10 चाकी टाटा ट्रक MH-31/CV-0817 - किंमत ₹15 लाख, 35 गोवंश (31 गायी व 4 बैल) - किंमत ₹7 लाख, 2 मोबाईल हँडसेट - किंमत ₹35 हजार, एकूण मुद्देमाल: ₹22.35 लाखाचा माल जप्त केला.
या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, 1960, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976 तसेच बीएनएस, 2023 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात एलसीबी उपविभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
_______________________________
भद्रावती: एलसीबीची गोवंश तस्करीवर कारवाई
नाकाबंदी तोडून पळणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून 35 गोवंशांची सुटका. ₹22.35 लाखांचा ट्रक व मुद्देमाल जप्त. 2 आरोपी अटकेत, 2 फरार. प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल.


0 टिप्पण्या