Ticker

6/recent/ticker-posts

हरित नांदेड अभियानांतर्गत हनुमानगड परिसरात वृक्षारोपण;


भक्त निवासाच्या कामाचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन
 

चित्रा न्युज प्रतिनिधी 

नांदेड: "शहराला पर्यावरणपूरक आणि सुंदर बनवण्यासाठी 'हरित नांदेड अभियाना' अंतर्गत नागरिकांनी व  सामाजिक संस्थांनी जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे," असे आवाहन *खासदार अशोकराव चव्हाण* यांनी केले आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरुद्वारा लंगर साहिब आणि वृक्ष मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त पुढाकाराने शहरात राबवल्या जाणाऱ्या हरित नांदेड अभियानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या अभियानाचा एक भाग म्हणून, महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक २ अशोक नगर च्या वतीने शनिवार दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी हनुमानगड परिसरात ट्री गार्डसह भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. तसेच, याच प्रसंगी श्रीक्षेत्र हनुमान गड देवस्थान परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी 'भक्त निवासस्थान' इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन *महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार श्री अशोकराव चव्हाण* यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास *महापौर सौ.कविता संतोष मुळे, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, महंत गरुडदासची त्यागी महाराज, विधानपरिषद आमदार अमर राजुरकर, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेता महेश कनकदंडे, शिक्षण महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, उपसभापती निरंजना लांडगे, गटनेता संदीपसिंग गाडीवाले, माजी महापौर बलवंतसिंग गाडीवाले, माजी सभापती किशोर स्वामी, माजी महापौर शैलजा स्वामी, नगरसेवक प्रशांत तिडके, दयानंद वाघमारे, सुहास कल्याणकर, सरिता बिरकले, साहेबराव गायकवाड, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त गंगाधर इरलोड, उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा बेग, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, क्षेत्रिय अधिकारी राजेश जाधव* यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक *माजी सभापती तथा नगरसेवक किशोर स्वामी* यांनी करताना "खा.अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना हनुमान गड परिसराचा विकास झपाट्याने झाला" असे त्यांनी नमुद केले, त्याचप्रमाणे हनुमानगड देवस्थान परिसरातील विकास कामांसाठी, प्रभागातील रस्ते, कै.शंकरराव चव्हाण अभ्यासिका इत्यादी कामांसाठी त्यांनी वाढीव निधीची याप्रसंगी मागणी केली. तसेच विमानतळ व एमजीएम कॉलेज या परिसरातील पाण्यामुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची विनंती यावेळी त्यांनी केली.

हरित नांदेड अभियाना अंतर्गत नांदेड शहरात १० हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असुन प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयामार्फत प्रभाग निहाय नियोजन करून हे अभियान महापालिकेच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत लावलेली झाडे सुरक्षित राहावीत आणि त्यांचे जनावरांपासून संरक्षण व्हावे, यासाठी हनुमानगड परिसरात प्रत्येक रोपट्याला ट्री गार्ड बसवण्यात आले आहेत.हे अभियान यशस्वी करण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरुद्वारा लंगर साहिब प्रशासन आणि वृक्ष मित्र फाउंडेशन एकत्रितपणे काम करत आहेत. त्याचबरोबर श्रीक्षेत्र हनुमान गड देवस्थान येथे दूरवरून येणाऱ्या भाविकांची राहण्याची सोय व्हावी, यासाठी सर्वसोयींनी युक्त अशा भक्त निवासाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. येथील देवस्थानाच्या कामासाठी यापूर्वी नांदेड उत्तरचे आ.बालाजीराव कल्याणकर यांच्या प्रयत्नातून रुपये २.०० कोटीचा विकास निधी प्राप्त झालेला होता, आता उर्वरित कामासाठी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत रुपये १.५० कोटीचा निधी येथील कामासाठी प्राप्त झालेला आहे.

लोकसहभागातून नांदेड शहर अधिक हरित आणि प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला.हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक नांदेड घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरत असून, लोकसहभागातून वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक बळकट होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

*चौकट*
*पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळ गरजेची: खा. अशोकराव चव्हाण*
"हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी केवळ शासकीय पातळीवर प्रयत्न करून चालणार नाही, तर पर्यावरण रक्षणासाठी 'हरित नांदेड' ही एक लोकचळवळ बनली पाहिजे. वृक्ष लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते जगवणेही गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिसरात वृक्षारोपण झाल्यानंतर त्या वृक्षाची जबाबदारी घेतली पाहिजे.  श्रीक्षेत्र हनुमान गड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र परिसरात वृक्षराजी नटण्यासोबतच, येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बांधण्यात  येत असलेले 'भक्त निवास' हे नांदेडच्या धार्मिक पर्यटनाला अधिक सोयीस्कर ठरेल. मनपा, गुरुद्वारा लंगर साहिब आणि वृक्ष मित्र फाउंडेशनचे काम नक्कीच कौतुकास्पद आहे."
— अशोकराव चव्हाण, खासदार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या