Ticker

6/recent/ticker-posts

सद्भावनेतून मानवतेकडे जाण्याचा विद्यार्थ्यांना संदेश


आनंदनिकेतन महाविद्यालयात जागतिक मानवतावादी दिवसानिमित्त अतिथी व्याख्यान

प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर

चंद्रपूर :जात, धर्म, भाषा आणि प्रांताच्या सीमा ओलांडून गरजू माणसाच्या मदतीला धावून जाणे म्हणजेच खरी मानवता आणि सद्भावना होय, असा संदेश आनंदनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आला. महारोगी सेवा समिती, आनंदवन संचालित आनंदनिकेतन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक मानवतावादी दिवस व सद्भावना दिनानिमित्त अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मृणाल काळे होते, तर डॉ. पल्लवी ताजने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

भारतीय संस्कृतीतील सद्भावनेची उदाहरणे देताना त्यांनी ऋग्वेदातील “संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्” हा मंत्र उद्धृत केला. “एकत्र चला, एकत्र बोला आणि तुमची मने एकत्र असू द्या” हा या मंत्राचा व्यापक अर्थ विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला. त्याचप्रमाणे उपनिषदातील “ईशावास्यमिदं सर्वम्” आणि “वसुधैव कुटुम्बकम्” या संकल्पनांतून संपूर्ण विश्व एक कुटुंब असल्याचा संदेश भारतीय विचारपरंपरेने दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

“सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः...” या प्रार्थनेतून प्रत्येकाच्या सुखाची आणि कल्याणाची अपेक्षा व्यक्त होते. त्यामुळे भारतीय संस्कृतीतील मानवतावाद हा केवळ विचार न राहता जीवनव्यवहाराचा भाग बनला पाहिजे, असे डॉ. ताजने यांनी नमूद केले.

आधुनिक भारतातील मानवतावादी कार्याचा संदर्भ देताना साने गुरुजी, बाबा आमटे आणि तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला. साने गुरुजींच्या श्यामची आईमधून मिळणारे प्रेम, करुणा आणि संस्कार; बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी उभे केलेले आनंदवन, कुष्ठरोग निवारणाच्या कार्यातील इतरांचे कार्य आणि बाबा आमटे यांच्या कार्यातील फरक त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला आणि तुकडोजी महाराजांनी दिलेला ग्रामविकास व समाजसेवेचा संदेश ही सद्भावनेची प्रेरणादायी उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य “Not Me But You” हेच मुळात सद्भावना आणि मानवतावादाचे ब्रीद असून तेच विद्यार्थ्यांच्या सामाजिक जीवनाचे मार्गदर्शक तत्त्व असावे, असे आवाहन त्यांनी केले. 

कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. धनश्री पंचभाई, प्रा. सुरेश राठोड आणि प्रा. नीरज आत्राम यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी मानवता, सहकार्य, बंधुभाव आणि सेवाभाव आपल्या दैनंदिन जीवनात रुजविण्याचा संकल्प करावा, या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या