भद्रावतीत महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर, पोलीस ठाण्यातही तक्रार
चंद्रपूर प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला भेडसावणारी समस्या म्हणजे महावितरणची स्मार्ट मिटर सक्ती. साध्या मिटरच्या तुलनेत स्मार्ट मिटरचे दुप्पट विज बिल येत असल्याच्या तक्रारी सर्वत्र होत असतानाही महावितरणचे अधिकारी मानायला तयार नाहीत. या विरोधात शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा आक्रमक झाली आहे.
भद्रावतीत शिवसैनिकांकडे रोज स्मार्ट मिटर विरोधात तक्रारी येत आहेत. महावितरणचे अधिकारी नागरिकांच्या घरी येऊन स्मार्ट मिटर लावण्यास सक्ती व जबरदस्ती करीत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
या पुर्वीही जून 2026 मध्ये शिवसेना तर्फे महावितरण केंद्र भद्रावती येथे निवेदन देऊन सक्तीने स्मार्ट मिटर लावल्यास शिवसैनिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र महावितरणवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
महावितरणने दादागिरी करत पुन्हा नवीन ग्राहकांना व मिटर बदलणाऱ्या ग्राहकांना सक्तीने स्मार्ट मिटर लावण्यास सुरुवात केल्याच्या तक्रारी शिवसैनिकांकडे आल्या.
त्यानुसार दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी पुन्हा महावितरण केंद्र भद्रावती गाठून शिवसैनिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरले. "कोणाच्या आदेशाने सक्तीने स्मार्ट मिटर लावण्यात येत आहे?" असा जाब अधिकाऱ्यांना विचारण्यात आला.
यासोबतच भद्रावती महावितरणच्या दादागिरीबाबत माननीय पोलीस निरीक्षक भद्रावती यांना निवेदन देऊन अवगत करण्यात आले आहे.
स्मार्ट मिटर लावण्याचा शासनाचा कोणताही आदेश नसल्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदयांनीही शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सांगितल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले.
या आंदोलनात शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे भद्रावतीचे शहर प्रमुख बंटी हेमके, उप तालुका प्रमुख गोलु गेडाम, शहर संघटक नागेंद्र चटपल्लीवार, उप शहर प्रमुख अरविंद खोबरे, विभाग प्रमुख प्रभाकर वाणी यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
स्मार्ट मिटर सक्ती थांबवण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
_____________________________
भद्रावती: स्मार्ट मिटर सक्तीविरोधात शिवसेना आक्रमक
महावितरण अधिकारी जबरदस्तीने स्मार्ट मिटर लावत असल्याचा आरोप. 3 ऑगस्टला कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना जाब. पोलीस ठाण्यातही तक्रार. जिल्हाधिकाऱ्यांनीही सक्तीचा आदेश नसल्याचे सांगितले.


0 टिप्पण्या