(१७ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन)
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT-CET) सेल, मुंबई यांच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी मदत केंद्र (Student Assistance Centre – SAC/VMK) सुरू करण्यात आले असून,भंडारा जिल्ह्यात हे केंद्र *जि.प. जकातदार कनिष्ठ महाविद्यालय (माजी शासकीय), भंडारा* येथे कार्यरत आहे. नुकतेच या केंद्राचे उद्घाटन जकातदार कनिष्ठ महाविद्यालय च्या मुख्याध्यापिका सौ.रिना काळे यांचे हस्ते प्रमुख पाहुणे श्री मो.सईद शेख यांचे प्रमुख उपस्थितीत फित कापून करण्यात आले.केंद्रामार्फत विद्यार्थी व पालकांना *सोमवार ते शनिवार सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.००* ( शासकीय सुट्या वगळून) वाजेपर्यंत प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व मार्गदर्शन *पूर्णपणे विनामूल्य* उपलब्ध करून दिले जात आहे.
दरवर्षी हजारो विद्यार्थी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, विधी, व्यवस्थापन, वास्तुकला, आयुष, शिक्षक शिक्षण व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी CET सेलमार्फत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतात. या प्रक्रियेत ऑनलाइन नोंदणी, अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी, CAP प्रक्रिया, महाविद्यालय निवड (Option Form), प्रवेश फेऱ्या, प्रवेश निश्चिती तसेच विविध तांत्रिक बाबींविषयी विद्यार्थ्यांना अनेक शंका निर्माण होतात. अशा सर्व शंकांचे निरसन आणि अधिकृत मार्गदर्शन विद्यार्थी मदत केंद्रात केले जाते.
या केंद्रामध्ये CET सेलमार्फत राबविण्यात येणाऱ्या १७ विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले जाते. ऑनलाइन अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची माहिती, प्रवेश नियम, वेळापत्रक, प्रवेश फेरीतील प्रक्रिया, तांत्रिक अडचणींचे निराकरण तसेच विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नांचे समाधान एकाच ठिकाणी केले जाते.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश प्रक्रियेची अचूक, अधिकृत व पारदर्शक माहिती सहज उपलब्ध व्हावी, कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने CET सेलने हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.
भंडारा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व महाविद्यालयांनी या मोफत सेवेचा लाभ घ्यावा. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील कोणतीही अडचण अथवा शंका असल्यास जि.प. जकातदार कनिष्ठ महाविद्यालय (माजी शासकीय), भंडारा येथे कार्यरत विद्यार्थी मदत केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT-CET) सेलतर्फे करण्यात आले आहे.
विद्यार्थी मदत केंद्राचा पत्ता :
जि.प. जकातदार कनिष्ठ महाविद्यालय (माजी शासकीय), भंडारा
कार्यालयीन वेळ :
सोमवार ते शनिवार : सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.००


0 टिप्पण्या