तळेगाव दशासर येथील गायत्री क्लिनिकची आरोग्य विभागाकडून चौकशी; पुढील तपास पोलीसांकडे
चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती / तळेगाव दशासर : ग्राम तळेगाव दशासर येथील काही ग्रामस्थांनी दिलेल्या लिखित तक्रार अर्जानुसार, आठवडी बाजार रोडवरील गायत्री क्लिनिकचे संचालक संजय देवराव सवंदळे हे आवश्यक वैद्यकीय पदवी, वैद्यकीय व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र व कायदेशीर परवानगी नसताना वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची तक्रार आरोग्य विभागाकडे प्राप्त झाली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अमरावती यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशी प्रक्रिया सुरू केली. तसेच समिती अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी, पंचायत समिती धामणगाव रेल्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय समितीमार्फत संबंधित प्रकरणाची तपासणी करण्यात आली.
समिती सचिव तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक सुदेवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकातील सदस्यांनी दि. 23 जुलै 2026 रोजी तळेगाव दशासर येथील गायत्री क्लिनिकला प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी व पाहणी केली. क्लिनिकमध्ये उपलब्ध कागदपत्रे, वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित नोंदी, परवानग्या आणि आवश्यक प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.
या पाहणीनंतर संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान आढळलेल्या बाबींचा पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी प्रकरण पोलीस स्टेशन तळेगाव दशासर यांच्याकडे सोपविण्यात आले असून पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
गावातील नागरिकांनी वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तीकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोंदणी क्रमांक व अधिकृत परवाने आहेत का याची खात्री करूनच उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. अनधिकृत वैद्यकीय व्यवसायामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा तक्रारींबाबत प्रशासन सतर्क असून आवश्यक त्या कायदेशीर कार्यवाहीसाठी पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


0 टिप्पण्या