Ticker

6/recent/ticker-posts

खरीप हंगाम २०२२ मध्ये धानपीक लागवडीचे क्षेत्र वाढले


२२ हजार १०० हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका तर ७१५ हेक्टर क्षेत्रात आवत्या धान 

 कृषी विभागाचे पीक पेरणी अहवालातील आकडेवारी 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा

 भंडारा :-लाखनी तालुक्यात धान पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २२ हजार ६१८ हेक्टर होते. त्यात २१ हजार ९३० हेक्टर क्षेत्रात रोवणी तर ६९८ हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची लागवड करण्यात येत होती. खरीप हंगाम २०२२ मध्ये २२ हजार १०० हेक्टर क्षेत्रात रोवणी तर ७१५ हेक्टर क्षेत्रात आवत्या एकूण २२ हजार ८१५ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे १३ जुलै रोजी च्या पीक पेरणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. या वरून चालू खरीप हंगामात धान पिकाखालील क्षेत्रात १९७ हेक्टर वाढ झाली आहे. या शिवाय कडधान्य, तेलबिया व नगदी पिकांचीही लागवड करण्यात आल्याचे पंचायत समिती चे कृषी अधिकारी एम.के. जांभूळकर, विस्तार अधिकारी के.एन. चव्हाण यांनी सांगितले.  
           साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र २८ हजार ५५५ हेक्टर, खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २४ हजार ६९० हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगाम २०२२ मध्ये २२ हजार ८१५ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यात २२ हजार १०० हेक्टर क्षेत्रात रोवणी तर ७१५ हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची लागवड करण्यात आली आहे. मृग नक्षत्राच्या शेवटी तालुक्यात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असल्यामुळे पेरणीस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आद्रा नक्षत्रातही पाऊस झाल्यामुळे पेरणी आटोपून रोवणीस सुरुवात करण्यात आली. १३ जुलै पर्यंत  ३ हजार ६३७.४० हेक्टर क्षेत्रात रोवणी झाल्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे पीक पेरणी अहवालात नमूद आहे.  धान पीकाशिवाय १ हजार ९९१.१२ हेक्टर क्षेत्रात कडधान्य लागवड करण्यात येणार असून तुर बांधावर १११८.४६ हेक्टर , तुर सलग ४७.७५ हेक्टर या शिवाय १७.२५ हेक्टर क्षेत्रात इतर कडधान्य पिकाची लागवड करण्यात आली आहे. १७७.६२ हेक्टर क्षेत्रात तेलबिया पिकाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असले तरी खरीप तीळ २५.२० हेक्टर आणि सोयाबीन ४ हेक्टर तर इतर तेलबिया पिके १० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ३७७.१० हेक्टर क्षेत्रात ऊस लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असले तरी कापूस ०.८० हेक्टर, पूर्व हंगामी ऊस १२ हेक्टर, आडसाली ०.५९ हेक्टर, ऊस(सुरू) २ हेक्टर आणि ऊस(खोडवा) २९ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. नगदी पिकांचे ९४.६० हेक्टर क्षेत्रात लागवडीचे उद्दिष्ट असून हळद ८ हेक्टर, अद्रक ०.४० हेक्टर, भाजीपाला ८३.८० हेक्टर, पपई १.४०, इतर पिके १ हेक्टर मध्ये लागवड करण्यात आली असल्याचे पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम.के. जांभूळकर यांनी सांगितले. यावेळी कृषी विस्तार अधिकारी के.एन चव्हाण, भांडारकर प्रामुख्याने उपस्थित होते. 

३६७ मिमी पावसाची नोंद

लाखनी तालुक्याचे १ जून ते ३० ऑक्टोबर या कालावधीचे एकूण पर्जन्यमान १११०.४० मीमी असून १ जून ते १४ जुलै पर्यांत सरासरी ४३७.१० मिलिमीटर पाऊस पडतो. चालू खरीप हंगामात १४ जुलै पर्यंत ३६७ मिमी पावसाची प्रशासनाने नोंद घेतली आहे. मागील खरीप हंगामात १४ जुलै पर्यंत ४९७.२० मिमी पाऊस पडला होता. मागील वर्षीच्या तुलनेत १३०.२ मिमी पाऊस कमी झाला असला तरी त्याची सरासरी ८४ टक्के आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या