लाखोरी येथील घटना
लाखनी पोलिसांनी केला गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा:- काम आटोपून स्वगावाकडे परत जात असताना विजेच्या खांबास मोटारसायकल ने धडक दिल्याने खाली पडून मोटारसायकल चालक जागीच ठार तर मागे बसलेला युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी(ता.२) रात्री ८:३० वाजताच्या दरम्यान घडली. मृतक नाव नीलकमल उर्फ चिंटू तामेश्वर टेंभूर्णे(२३) तर गंभीर जखमीचे नाव प्रणय टेंभूर्णे(२२) रा. सालेभाटा, तालुका लाखनी असे आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
चिंटू आणि प्रणय हे सुझुकी जिक्सर मोटारसायकल क्रमांक एमएच ४० बीडब्ल्यू ५३२६ ने काही कामानिमित्त तालुक्याचे ठिकाणी गेले होते. काम उशिरा झाल्याने रात्रीचे सुमारास स्वगावाकडे(सालेभाटा) परत जात असताना लाखोरी येथे रस्त्यालगत असलेल्या विजेच्या खांबाला धडक दिल्याने मोटारसायकल चालक नीलकमल उर्फ चिंटू टेंभूर्णे जागीच ठार झाला. तर मागे बसलेला प्रणय टेंभूर्णे गंभीर जखमी झाला. मोठ्याने झालेल्या आवाजामुळे गावकरी घटनास्थळावर जमा झाले. अपघाताची सूचना लाखनी पोलिस व अपघातग्रस्त युवकांचे कुटुंबियांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी युवकाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तर उत्तरीय परिक्षणासाठी मृतदेह पाठविण्यात आला. शवपरिक्षणांतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हयगयिने व निष्काळजीपणे मोटारसायकल चालवून अपघात करुन स्वतःचे मरणास कारणीभूत होणे तसेच मागे बसलेल्या युवकास गंभीर जखमी केल्या प्रकरणी लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक २६०/२०२२ कलम २७९,३३८,३०४(अ) भादवि आणि मोटारवाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या