• सरपंच, उपसरपंच, तमुस अध्यक्षवर गुन्हा दाखल
• कनेरी/दगडी येथील घटना
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324
भंडारा :- लाखनी तालुक्यातील कनेरी/दगडी येथे कर्तव्यावर असलेल्या वैद्यकिय अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना दवाखान्यात जाऊन आरडाओरड करून मारहाण केल्यावर दवाखान्याचे बाहेरील चॅनल गेट ला कुलूप लावून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सरपंच लता शेंडे(६३), उपसरपंच प्रदीप राघोर्ते(३५) व तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन गोमासे(३७) सर्व राहणार कनेरी/दगडी, तालुका लाखनी यांचेवर समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहा मडामे यांची फिर्याद व वैद्यकिय अहवालावरून लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
ग्रामीण परिसरातील दारिद्य्र रेषेखालील व गरीब कुटुंबातील रुग्णांना नाममात्र शुल्क आकारून गाव आणि परिसरात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी. या करिता जिल्हा परिषद भंडारा चे वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र पोहरा चे अधिनस्त कनेरी/दगडी येथे आयुर्वेदिक दवाखाना आणि आरोग्यवर्धीनी उपकेंद्र चालविले जाते. आयुर्वेदिक दवाखान्यात डॉ. सायली डहारे तर आरोग्यवर्धीनी उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहा मडामे व कंत्राटी आरोग्य सेविका लूटे कार्यरत आहेत. गुरुवारी(ता.१०) सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास वैद्यकिय अधिकारी डॉ. रविशंकर हलमारे निरिक्षणासाठी आले होते. आलेले रुग्ण तपासून उपचार करणे व कार्यालयीन कामकाज सुरू असताना सरपंच लता शेंडे, उपसरपंच प्रदीप राघोर्ते व तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन गोमासे हे आरोग्यवर्धीनी उपकेंद्रात आले व आरडाओरड करून कर्तव्यावर असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहा मडामे यांना ओढाताण, लाथा-बुक्क्याने मारहाण करून उजवे हाताचे खांद्याला दुखापत करून सहकारी कर्मचारी लूटे तसेच आयुर्वेदिक दवाखान्यातील डॉ. सायली डहारे व डॉ. रविशंकर हलमारे यांना दवाखान्याचे चॅनल गेट ला बाहेरून कुलूप लावून आतमध्ये कोंडून ठेवले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, पोलिस हवालदार सुभाष राठोड, दिगंबर तलमले, पोलिस शिपाई पियूष बाच्छील, प्रशांत धकाते, स्वप्नील कहालकर, महिला पोलिस शिपाई स्वाती नागदेवे घटनास्थळी गेले. सरपंचासह जमलेल्या गावकऱ्यांची समजूत काढून जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. भंडारा यांना घटनेची माहिती दिली. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धनविजय, जिल्हा पर्यवेक्षक राजेश ठाटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील हटनागर, कुष्ठरोग तंत्रज्ञ निरंजन पाखमोडे यांनी घटनास्थळी जाऊन सरपंच, उपसरपंच व तमुस अध्यक्षासह उपस्थितांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचे लेखी आश्वासन देऊन दवाखान्याच्या चॅनल गेट चे कुलूप उघडून ओलीसांची सुटका केली. पदाचा दुरुपयोग करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी समुदाय आरोग्य अधिकारी यांचे फिर्यादीवरून तथा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांचे अहवालावरून लाखनी पोलिसांनी सरपंच लता शेंडे, उपसरपंच प्रदीप राघोर्ते, तमुस अध्यक्ष सचिन गोमासे यांचे विरुद्ध अपराध क्रमांक ३०९/२०२३ अन्वये गुन्हा दाखल केला असून कलम ३५३, ३३२, ३४२, १८६, ३४ भादवि अन्वये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवाने तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या