Ticker

6/recent/ticker-posts

तालुकास्तरीय ‘अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन’ प्रशिक्षण उत्साहात

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा:- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ह्या विषयीचे  तालुकास्तरीय प्रशिक्षण स्व. निर्धनराव पाटील वाघाये सैनिकी विद्यालय केसलवाडा/वाघ येथे उत्साहात पार पडले.  
              जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडविण्यासाठी पहिल्या टप्प्यात लाखनी तालुक्यातील १५० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. पुढील टप्प्यात तालुक्यातील उर्वरित इयत्ता १ ते ८ च्या सर्व शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात जागतिक दर्जाची स्वीकार्यता असलेले मूल विकसित करणे, असे व्यक्तित्व विकसित करणे जे  भविष्यासाठी तयार असेल, १०० टक्के मुलांच्या १०० टक्के क्षमतांचा उपयोग करणे, पिसा रेडी मूल तयार करणे आणि हे करण्यासाठी शिक्षकांनी नियोजन, व्यवस्थापन आणि मुलांच्या शिकण्याचे नेतृत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.  
            विद्यार्थी विकासाचे चार टप्पे, विद्यार्थ्यांची अध्ययन गती पातळी, भविष्यवेधी शिक्षणाच्या सहा पायर्‍या, एकविसाव्या शतकासाठीची कौशल्य, मुलांना स्वत: शिकण्यास प्रेरित करणे, त्यांना विविध आव्हाने देणे, त्यासाठी इतरांची मदत घेणे, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, शिकण्याच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर करणे, त्यांची स्वत:ची शिकण्याची गती तिप्पट करणे, मेटाकॉग्निशन, सेल्फी विथ सक्सेस, भविष्यवेधी शिक्षणाचे चार आयाम, मुलांमधील मुख्य सहा क्षमता व नऊ प्रकारची बुद्धिमत्ता यांचा वापर अशा विविध नवनवीन संकल्पनांवर आधारित चर्चा, गटचर्चा व चित्रफीतीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण पार पडले. 
             गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात संपूर्ण प्रशिक्षणाची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी नरेश टिचकुले आणि सुधाकर झोडे यांच्या उपस्थितीत गटसमन्वयक खुशाल हरडे यांनी पार पाडली.  वेध परिवारातील राज्य सुलभक मंगला बोपचे यांनी प्रशिक्षण वर्गांना भेट देऊन मार्गदर्शन केले व प्रशिक्षणाविषयी शिक्षकांचे मनोगत जाणून घेतले. राज्य सुलभक पुरुषोत्तम झोडे, गिरीश बांते यांच्यासह महेश यावलकर, धनराज मेश्राम, चंद्रशेखर कापगते, सुनंदा टेंभुरणे, जयनारायन आमटे, पितांबर जगनाळे, प्रशांत मेश्राम यांनी सुलभक म्हणून कार्य केले. यासाठी विषय साधन व्यक्ती अर्चना गभणे, योगिता गोस्वामी, मनोज हलमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  

प्रतिक्रिया

विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत. चिकित्सक आणि सर्जनशील विचार करणारी मुले घडावीत, विद्यार्थ्यांत स्वयंअध्ययन करण्याची प्रेरणा व जागरूकता निर्माण व्हावी तसेच त्यांची शिकण्याची गती वाढावी यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल. 
 
पुरुषोत्तम झोडे राज्य सुलभक


प्रतिक्रिया

एकविसाव्या शतकातील कौशल्य आणि भविष्यवेधी शिक्षण आत्मसात करून आत्मनिर्भर भारतात अपेक्षा केल्याप्रमाणे आत्मविश्वासाने जीवन जगू शकणारा, भविष्यातील आव्हाने सक्षमपणे पेलणारा आत्मनिर्भर विद्यार्थी घडावा. यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 

सुभाष बावनकुळे, गटशिक्षणाधिकारी प.स. लाखनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या