Ticker

6/recent/ticker-posts

पिटेझरी इथे सर्पमित्रांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा

भारताचे विख्यात सर्पतज्ञ व लेखक निलीमकुमार खैरे यांचे मार्गदर्शन

निसर्गवेध संस्था,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व वनविभाग यांचा सयुंक्त उपक्रम



संजीव भांबोरे भंडारा 
भंडारा :- साकोली तालुक्यातील पिटेझरी येथे भंडारा जिल्ह्यातील सर्पमित्रांची एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा निसर्गवेध संस्था पुणे, ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी साकोली व वन तसेच वन्यजीव विभाग यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली.या कार्यशाळेला भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील तसेच गोंदिया जिह्यातील सडक अर्जुनी व तिरोडा तालुक्याचे सर्पमित्र मोठ्या संख्येने सहभागी झाले. 
 या सर्पमित्र कार्यशाळेमध्ये पुण्याहून सपत्नीक आलेले भारताचे प्रख्यात सरीसृप संशोधक व सर्पतज्ञ व सुप्रसिद्ध सरीसृप लेखक निलीमकुमार खैरे यांचे मिळालेले दोन तास मार्गदर्शन हे कार्यशाळेचे मुख्य आकर्षण होते.सोबतच गोरेवाडा प्राणी संग्रहालय नागपुरचे प्रकल्प संचालक दिपक सावंत,वर्धा येथील वाईल्ड अनिमल रेस्क्यू सेंटरचे संचालक कौस्तुभ गावंडे, वनविभाग भंडाराचे वनक्षेत्राधिकारी संजय मेंढे, मानद वन्यजीव अधिकारी नदीम खान इत्यादी जण उपस्थित होते
सर्वप्रथम कार्यशाळेची सुरवात अभिनवप्रकारे वृक्षकुंडयाना पाणी निलीमकुमार खैरे व त्यांचे अर्धांगिनी नंदीती खैरे यांचेद्वारे ओतल्यानंतर निसर्गवेध संस्थांचे संचालक पक्षीतज्ञ व निसर्गअभ्यासक किरण पुरंदरे यांनी सपत्नीक सर्वांना  शाल,श्रीफळ देऊन सर्वांचे स्वागत व सत्कार केला.कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना किरण पुरंदरे यांनी सर्पमित्रांना एकत्र आणून त्यांच्या समस्या सोडविणेसोबतच शिवाय सर्पमित्रांमध्ये शास्त्रीय तसेच संशोधनात्मक दृष्टीकोन विकसित करणे आहे असे सांगितले.
 सरीसृपतज्ञ व संशोधक निलीमकुमार खैरे यांनी कार्यशाळेचे प्रथम पुष्प गूंफताना  पीपीटी प्रेझेन्टेशन द्वारे सापांविषयी दोन तास मंत्रमुग्ध करणारी अभिनव अशी सर्वांगीण माहिती हसत खेळत दिली.त्यांनी साप हा शेतकऱ्यांचाच मित्र नाहीतर अखिल मानव जातीचा मित्र आहे असे सांगितले त्यामुळे सापांसोबत मित्राप्रमाणेच वागावे व सर्पमित्र चळवळीला गालबोट लागेल अश्या कृत्यापासून दूर राहावे असे कळकळीचे आवाहन त्यांनी सर्पमित्रांना केले.
 कार्यशाळेचे दुसरे पुष्प गुंफताना वनक्षेत्राधिकारी संजय मेंढे यांनी वन्यजीव कायदा 1972 व त्यात नुकत्याच झालेल्या  सुधारणा याबद्दल विस्तृतपणे माहिती सर्पमित्रांना देऊन कायद्याच्या चौकटीत राहून कसे कार्य करता येईल यावर सर्पमित्रांना पुरेपूर मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे तिसरे पुष्प मध्यंतरानंतर गुंफताना गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे संचालक दिपक सावंत यांनी सापांचे शास्त्रीय नावे सोप्या पद्धतीने कसे लक्षात ठेवावे यावर पीपीटी प्रेझेन्टेशनद्वारे एक तास प्रकाश टाकला तसेच  विषारी साप चावल्यानंतर सर्पमित्रांनी कशी काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षिकरित्या सादरीकरण केले.कार्यशाळेचे चौथे पुष्प गुंफताना वर्धा येथील वाईल्ड अँनिमल रेस्क्यु केंद्राचे संचालक कौस्तूभ गावंडे यांनी वन्यप्राणी पक्षी रेस्क्यू करताना येणाऱ्या अडचणी त्यावर करावयाचे प्राथमिक उपचार तसेच नंतरचे करावयाचे सखोल उपचार यावर सखोलपणे मार्गदर्शन केले.
 यानंतर खुल्या सत्रात 'झिरो डेथ स्नेक बाईट' मोहीम प्रत्यक्षात विदर्भात चालविणारे  नागपूर येथील सरीसृप संशोधक नितीश भांदककर  यांनी मागील आठ वर्षाचे अनुभव स्नेक बाईटबद्दल व्यक्त केले तसेव सर्पमित्रांना दंश झाल्यास नुकसान भरपाई यावर आपले अनुभव अडचणी मांडले.ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी सुद्धा सर्पमित्रांच्या ओळखपत्र,सर्पमित्रांनाच नाहीतर शेतकरी, शेतमजूर, गावकऱ्यांना विषारी साप चावल्यानंतरची होणारे शारीरिक,मानसिक आघात व यावर नुकसान भरपाई,विमा याविषयीच्या अडचणी मांडल्या.सर्पमित्र आशिक नैतामे अड्याळ यांनी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब साकोली व लाखनीने 20 वर्षांपूर्वी हे कार्य सर्वप्रथम भंडारा- गोंदिया जिल्ह्यात सुरू केल्याने ग्रीनफ्रेंड्स तर्फे त्या दोनतीन वर्षात विविध सापांचे रेस्क्यू बद्दल वर्तमानपत्रात येणाऱ्या जनजागृती बातम्या छायाचित्रे  वाचून बघून आम्ही उरलेल्या भंडारा -गोंदिया तालुक्यातील तरुण सुद्धा  नवसर्पमित्र म्हणून कसे प्रेरित झालो व आम्ही दोन तीन वर्षातच सर्पमित्र म्हणून कसे घडू लागलो असे आपले अनुभवात्मक मनोगत व्यक्त केले.
नुकसानभरपाई ,विमा,सर्पमित्र ओळखपत्र,रेस्क्यू सेंटर याबाबतीत सर्पमित्र कार्यशाळेत सरीसृपतज्ञ निलीमकुमार खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वपूर्ण ठराव  यावेळी पारित करण्यात आले व त्याचा शासनदरबारी पाठपुरावा करण्याची हमी सुद्धा त्यांनी घेतली.
 संपूर्ण कार्यशाळेचे  संचालन नियोजन निसर्गवेध संस्थाचे किरणदादा पुरंदरे ,अतिथीचा परिचय सर्वश्री दिपक सावंत, नदीम खान यांनी तर आभारप्रदर्शन ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी- साकोलीचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी केले.सर्पमित्र कार्यशाळेला आलेल्या प्रत्येक सर्पमित्रांना व अतिथींना निलीमकुमार खैरे लिखित भारतीय साप ही पुस्तक व त्यांच्याच स्वहस्ते ऑटोग्राफ दिलेली पुस्तक यासोबतच अनघा पुरंदरे संचालित सखी महिला बचत गट पिटेझरीतर्फे निर्मित पक्षी- प्राणी रंगविलेले कापडी पिशवी व वृक्षारोपण करण्यासाठी मूठभर वृक्ष बिया प्रत्येकांना भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या.
    सर्पमित्र कार्यशाळेचे यशस्वीपणे आयोजन करण्याकरिता निसर्गवेध संस्था पुणे,ग्रीनफ्रेंड्सचे नेचर क्लबचे सर्पमित्र युवराज बोबडे,मयुर गायधने,पंकज भिवगडे,नितीन निर्वाण,सरीसृप संशोधक आशिष वलथरे व विवेक बावनकुळे,सर्पमित्र  धनंजय कापगते, गुणवंत जिभकाटे, प्रफुल्ल वाघमारे,सुरेंद्र राऊत,समीर राऊत,भोवते,वनविभाग भंडारा तसेच वन्यजीव विभाग साकोली, बायसन पर्यटक कुटी पिटेझरीचे संचालक राजेश कोटांगले,निसर्गवेध संस्थेमार्फत आयोजित 1 दिवसीय सर्पमित्र कार्यशाळेला व भविष्यात सुद्धा सर्पमित्राच्या अशाच  विविध उपक्रमांना व प्रकल्पाला आर्थिक साहाय्य करणारे ब्रिजनेक्स्ट कंपनी पुणे, भोजन व्यवस्था सांभाळणारे अनिल भोंडे स्थानिक पिटेझरी गावकरी ,सखी महिला बचत गट व पाखरशाळा महिला व मुली कार्यकर्ते इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या