Ticker

6/recent/ticker-posts

बांधकाम विभागात मनुष्यबळाअभावी विकास कामे रखडण्याचे मार्गावर

• पंचायत समिती लाखनी येथील प्रकार 

• १ शाखा अभियंता व २ स्थापत्य अभियंता सहाय्यकाची पदे रिक्त 


कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- ग्रामपंचायतीमार्फत ग्रामीण परिसरात करण्यात येणारी विविध विकास कामे दर्जेदार व्हावीत. या करिता तांत्रिक मार्गदर्शन, सनियंत्रण व देखरेखीचे काम पंचायत समितीच्या बांधकाम विभागात कार्यरत कनिष्ठ व शाखा अभियंता यांना करावे लागते. पण मंजूर कर्मचाऱ्यांच्या संख्येपेक्षा निम्याअधिक जागा रिक्त असल्याने मनुष्यबळाअभावी विकास कामांचे सनियंत्रण करणे अशक्यप्राय बाब झाली आहे. त्यामुळे विकास कामांची प्रतवारी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी यांनी या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष पुरवून लाखनी पंचायत समितीचे बांधकाम विभागात रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी. अशी मागणी होत आहे. 
                        साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखांदूर तालुक्याची निर्मिती करण्यात आली. १ नगर पंचायत व ७१ ग्रामपंचायतीत १०४ गावे समाविष्ट असून ९४ लोकवस्तीची तर १० गावे रीठी आहेत. या गावात पंचायत समितीच्या सनियंत्रणात दलीत वस्ती सुधार योजना, जनसुविधा, नागरी सुविधा, १५वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर आणि पंचायत समिती स्तर, ग्राम निधी, तांडा वस्ती सुधार योजना इत्यादी योजनेतील विकास कामे केली जातात. विकास कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाची कामे कनिष्ठ अथवा शाखा अभियंत्यांना करावी लागतात. या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या कुशल कमावरही देखरेख ठेवण्याचे अधिकार या अभियंत्यांना देण्यात आले आहे. 
                          लाखनी ला तहसीलचा दर्जा मिळाल्यापासून १ मे २००० रोजी पंचायत समिती कार्यालयास सुरुवात झाली. पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या आकृतीबंधानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामावर देखरेखीसाठी २ शाखा अभियंता व ३ स्थापत्य अभियंता सहाय्यक ही पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्या पैकी शाखा अभियंता पदी डी.जी. राघोर्ते व एस. व्ही. महाकाळकर कार्यरत होते. त्या पैकी फक्त एस. व्ही. महाकाळकर यांचे इतरत्र स्थानांतरण करण्यात आले. त्यांचे जागेवर नियुक्ती केली गेली नसतांना त्यांना सोडण्यात आल्याने एकाच शाखा अभियंत्यावर पूर्ण तालुक्याचा भार आला आहे. मंजूर ३ स्थापत्य अभियंता सहाय्यक पदे असली तरी मागील २ वर्षापासून २ जागा रिक्त असून एकमेव महिला स्थापत्य अभियंता सहाय्यक कार्यरत असून त्यांचेकडे घरकुलाचे काम पाहण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंजूर पदे आणि रिक्त पदांचा विचार केल्यास आजघडीस पंचायत समिती लाखनी च्या बांधकाम विभागात निम्यापेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. 
                         या प्रकाराने तालुक्यात सुरू असलेले विकास कामांकडे कार्यरत शाखा अभियंत्यांस लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. त्यामुळे विकास कामांचा दर्जा घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम निकृष्ट झाल्यामुळे त्याचे परिणाम ग्रामीण जनतेला भोगावे लागतील. यावर मात करण्यासाठी मंजूर पदे भरणे आवश्यक आहे. पण लाखनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात याहून चित्र वेगळे आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या गंभीर बाबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी यांनी दखल घेऊन तत्काळ रिक्त पदे भरण्यात यावी. अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या