कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- खरीप हंगाम २०२४ मध्ये लाखनी तालुक्यात जुलै च्या पहिल्या आठवड्यात २०.७० टक्के पावसाची नोंद करण्यात आली होती. जवळपास तेच प्रमाण ऑगस्ट चे पहिल्या आठवड्यात दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्याची सरासरी २९६.५० मिलीमीटर असून ७ ऑगस्ट पर्यंत लाखनी तालुक्यात ५४.२० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्याचे शेकडा प्रमाण १८.३० टक्के आहे.
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र ३३ हजार १७३.३६ हेक्टर असून खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २४ हजार ०६९ हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगाम २०२४ मध्ये भात पिकाखालील क्षेत्र २२ हजार २०८ हेक्टर असून पऱ्हे(नर्सरी) २२ हजार ३६०.७० हेक्टर क्षेत्रात तर आवत्या ८४७.३० हेक्टर क्रेत्रात अशी एकूण २३ हजार २३५ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. तालुक्याचे ऑगस्ट २०२४ चे सरासरी पर्जन्यमान २९६.५० मिलीमीटर आहे. त्यापैकी ७ ऑगस्ट पर्यंत तालुक्यात ५४.२० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
रोहिणी नक्षत्रापासून पावसाची सुरुवात होत असते. चालू खरीप हंगामात रोहिणी कोरड्या गेल्या. तर मृगाचे शेवटी व आद्रा नक्षत्राचे सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुनर्वसु नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाला. तर पुष्य नक्षत्रात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या आश्लेषा नक्षत्र सुरू असून पावसाची रीपझिप सुरू आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण असून याचा धान पिकावर विपरीत परिणाम होत आहे. तालुक्यात लाखनी, पिंपळगाव, पोहरा, पालांदूर व मुरमाडी/तूप. अशी ५ महसूल मंडळ असून सर्वच ठिकाणी पर्जन्य मापक यंत्र बसविण्यात आले आहे. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत लाखनी ६१.७० मिलिमीटर, पोहरा ४७ मिलिमीटर, पालांदूर/चौरास ५६.५० मिलिमीटर, पिंपळगाव/सडक ५५.५० मिलिमीटर तर मुरमाडी/तूप ५०.४० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी ५४.२० मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या १८.३० टक्के आहे.


0 टिप्पण्या