कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यात खरीप हंगाम २०२४ मध्ये बहुतांश रोवणी आटोपण्याच्या मार्गावर असून आवत्या पिकांचीही पेरणी पूर्ण झाली असतांनाच वातावरणातील बदलामुळे, ढगाळ वातावरणामुळे धान पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून मिळेल तिथून कीटकनाशके किंवा आवश्यक तो औषधसाठा घेऊन उपाययोजनेचे कामात व्यस्त असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र ३३ हजार १७३.३६ हेक्टर असून खरीप पिकाखालील क्षेत्र २२ हजार २०७.७८ हेक्टर आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये २ हजार १४५.५५ हेक्टर क्षेत्रात नर्सरी(पऱ्हे)ची लागवड करण्यात आली. तर ५०८.२० हेक्टर क्षेत्रात आवात्या धानाची लागवड करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांच्याकडील रोवणी जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. काही शेतकऱ्यांची रोवणी होऊन महिनाभराचा कालावधी झाला आहे. आधी रोवणी झालेल्या धानास खोडकिडा या आळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या धान उत्पादनाच्या निदर्शनास आल्याने कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजनांची तयारी सुरू करण्यात आली आहे. रासायनिक खताच्या अत्याधिक वापरामुळे सेंद्रिय खताचे प्रमाण कमी झाल्याने धान पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत असल्याच्या धान उत्पादकात चर्चा होत आहेत.
हि करावी उपाय योजना
धान पिकावर खोडकिडाचा प्रादुर्भाव झाल्यास फिप्रोनिल ०.३६(२५किलो/हे), क्लोरपायरिफॉस किंवा क्लोरपायरिफॉस मिथिल १० ग्रॅ (१० किलो/हे) किंवा क्लोरँट्रानिलिप्रोल १० किलो/हे. याप्रमाणे दाणेदार कीटनाशके वापरावीत. जर (२५-३० नर पतंग/सापळा अठवडा) सीमा ओलांडली गेली तर क्लोरपायरिफॉस २० इसी किंवा(२००० मि.ली/हे) किंवा फिप्रोनिल ५ एससी (८०० मि.ली/हे) किंवा क्लोरँट्रानिलिप्रोल (०,३ मि.ली./ली) ची फवारणी करावी.


0 टिप्पण्या