Ticker

6/recent/ticker-posts

आठवडाभरात शाळेला शिक्षक द्या, अन्यथा कुलूप ठोकणार

• पं. स. सदस्यांसह पालकांचा निवेदनाद्वारे शिक्षण विभागाला इशारा

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यातील सावरी/मुरमाडी येथील जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळेत मागील वर्षांपासून एकच शिक्षक कार्यरत असल्यामुळे कार्यालयीन कामकाजाकरिता जातांना शाळा बंद ठेवावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आठवडाभरात या शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी. अन्यथा पंचायत समिती सदस्य विकास वासनिक यांचे नेतृत्वात पालकांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नेताजी धारगावे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 
                    सावरी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी पर्यंत वर्ग आहेत. शाळेत पटसंख्या ४० असून, या ठिकाणी शासन निर्णयानुसार दोन शिक्षकांची गरज आहे. मात्र काही दिवसांपासून शाळेत एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेचा शैक्षणिक भार दिलेला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या शैक्षणिक क्षमता बांधणीनुसार वेळेअभावी शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सावरी गावालगत अनेक खासगी संस्थाचालकाच्या शाळा आहेत. त्यामुळे शिक्षकाअभावी जिप शाळेला मजुरा करून पालकवर्ग आपल्या पाल्याला  लगतच्या खासगी शाळेत प्रवेश करत  आहेत. त्यामुळे पटसंख्या कमी होऊन शाळेचे वर्ग तुटू शकतात. परिणामी पालकांनी वेळोवेळी पंचायत समितीकडे दुसऱ्या शिक्षकाच्या नियुक्तीची मागणी केली रिक्त भरतीमुळे शिक्षक नसल्याने केराची टोपली दाखविली आहे. आठवड्याभरात शाळेला शिक्षक मिळाला नाही तर, शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती सदस्य विकास वासनिक,सरपंच सचिन बागडे,उपसरपंच मंगेश धांडे,ग्रामपंचायत सदस्य आदित्य बागडे, मोहन रेहपाडे व समस्त पालकांनी निवेदनात केला असून निवेदन देतेवेळी उपस्थित होते .तसेच  गट विकास अधिकारी नेताजी धारगावे प.स.लाखनी यांना निवेदन दिले तेव्हा प.स सभापती प्रणाली सार्वे लाखनी, प.स.सदस्या मनिषा हलमारे लाखनी यांची उपस्थिती होती. पंचायत समिती प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते. याकडे ग्रामवासी जनतेसह पालकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या