तंमुस व पोलीसांकडून न्याय मिळाला नाही
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- लाखनी तालुक्यातील सोमलवाडा येथील वृद्ध दाम्पत्य रमेश कांबळे व ताराबाई कांबळे या दाम्पत्यांचे घराशेजारील संजय शेलारे याने कांबळे दाम्पत्याचे घराचे भिंतीला लागून घरकुल तयार केल्याने त्यांचे भिंतीवर पाणी झिरपून भविष्यात अनहोनी होण्याची शक्यता असल्याने वृद्ध दाम्पत्यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती सोमलवाडा व पोलिस ठाणे लाखनी यांचेकडे दाद मागितली. पण त्यांना न्याय मिळाला नाही. आता त्यांना न्याय कोण देणार ? हा प्रश्न त्या वृद्ध दाम्पत्यांना पडला आहे.
मागील अनेक वर्षापासून हे वृद्ध दाम्पत्य सोमलवाडा येथे वास्तव्यास असून त्यांच्या घरालगतच संजय शेलारे यांचे घर आहे. शेलारे यांच्या पत्नी व आईच्या नावाने घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम केले आहे. घरकुल बांधकाम करताना आपले जागेत व इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असताना संजये शेलारे यांनी वृद्ध कांबळे दाम्पत्यांचे घराचे भिंतीला लागूनच घरकुलाचे भिंत तयार केल्याने पावसाचे पाणी या वृद्ध दाम्पत्यांच्या भिंतीत झिरपल्यामुळे भिंतीची पडझड होऊन भविष्यात जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला न्याय मिळावा या उद्देशाने कांबळे दाम्पत्यांने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती सोमलवाडा तसेच पोलिस ठाणे लाखनी येथे तक्रार केली असता तक्रारीची सहनिशा केली गेली नाही. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्यांना न्याय कोण देणार ? असा प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थाही बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे हे वृद्ध दाम्पत्य न्यायचे प्रतीक्षेत आहे.


0 टिप्पण्या