Ticker

6/recent/ticker-posts

पूर ओसरला, परिस्थिती हळूहळू पूर्व पदावर

• धान पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान

• प्रशासनाकडून नुकसानीच्या पंचनाम्याची कामे सुरू

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज 
भंडारा :- महाराष्ट्र व मध्यप्रदेश च्या सीमेवर तथा जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसाने संजय सरोवराचे पाणी वैनगंगेत सोडल्यामुळे शहरासह जिल्ह्याचे अनेक भागात सतत ३ दिवस पूर परिस्थितीचा जिल्हा वासियांना सामना करावा लागला. पुरामुळे अनेक रस्ते बंद झाले होते. शहरासह नदी काठावरील अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने शकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. जलस्तर धोका पातळी पलीकडे गेल्याने तब्बल ४८ तास वैनगंगा नदीवरील लहान पूल पाण्याखाली होता. शहरातील सखल भागासह सहकार नगर, विद्या नगर, गणेशपूर, भोजापूर, मेंढा, ग्रामसेवक कॉलनी इत्यादी भागात पुराचे पाणी शिरले होते. तसेच पुराचे पाण्यात तब्बल ३ दिवस धान पीक राहिल्याने धान पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने धान उत्पादक हवालदिल झाला असल्यामुळे शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांस मदत करणे गरजेचे झाले आहे. पूर परिस्थितीवर जिल्हाधिकारी संजीव कोलते स्वतः लक्ष ठेऊन होते. तर राहत शिबिरांना स्वतः भेटी देऊन शिबिरार्थीची विचारपूस केली होती. 
                           खरीप हंगाम २०२४ चे सुरुवाती पासूनच पावसाचा लपंडाव सुरू आहे. धान पीक धोक्यात येण्याच्या शक्यतेमुळे शेतकरी धान पीक वाचविण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यास सज्ज झाला की संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. याचा प्रत्यय रोवणीचे सुरुवातीला तसेच आताही हलक्या प्रजातीचे धान पीक परिपक्व होण्याचे मार्गावर असताना तसेच मध्यम प्रजातीचे धान गर्भार अवस्थेत असताना आला. ११ व १२ सप्टेंबर रोजी आलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यात वासीयांना तब्बल ३ दिवस पूर परिस्थितीचा सामना करावा लागला. या संततधार पावसाने जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलाव, लघुपाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो झाले. तर जिल्ह्यातून प्रवाहित होणाऱ्या वैनगंगा, सुर, बावनथडी, चूलबंद यासह नाल्यांचा जलस्तर वाढून पुराचे पाणी शेतात शिरल्याने धान पीकासह भाजीपाल्याचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. पुराचा फटका जीवित व्यक्तीसह मृतदेहांनाहो बसला चूलबंद नदी काठावरील पाथरी व मरेगाव येथे १३ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेल्या लोकांना स्मशानभूमीत पुराचे पाणी असल्यामुळे प्रशासनाचे मध्यस्तीने लगतच्या गावाचे सीमेत अंत्यसंस्कार करण्यात आले. बपेरा पुलावर पुराचे पाणी असल्यामुळे महाराष्ट्र-मध्यप्रदेश आंतरराज्यिय वाहतूक तब्बल २४ तास ठप्प पडल्याने महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. तसेच तसाच प्रकार भंडारा ते तुमसर आणि लाखांदूर ते वडसा मार्गावरहो होता. या शिवाय ग्रामीण परिसरातील अनेक रस्ते पुरामुळे बंद झाले. पूर परिस्थितीत वैरणामुळे पाळीव प्राण्यांचेहो हाल झाले होते. पुराचे पाण्यामुळे पाइपलाईनमध्ये बिघाड झाल्याने भंडारा शहराचा पाणी पुरवठा १-२ दिवस बंद होता. 
                         वैनगंगेची पाणी पातळी २४७.८७ मीटर गेल्यामुळे नदीचे पाणी घरात शिरल्याने कारधा ६०, गणेशपूर ८६, भंडारा शहर ११, भोजापुर ३, दाभा १, जमनी ८३, पवना/खुर्द. १, बाम्हनी ६, या ७ गावातील २०० कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. तर शेकडो घरांचे नुकसान झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाव्दारे भंडारा व लाखांदूर तालुक्यातील ४३९ नागरिकांना बोटीव्दारे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. १३ सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात ११५३.८० पावसाची जिल्हा प्रशासनाने नोंद घेतली असून सरासरीच्या १२०.७० टक्के आहे. पुरामुळे अनेक रस्ते रहदारीसाठी बंद होते. धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे पुजारीटोला, गोसेखुर्द, धापेवाडा, संजय सरोवर इत्यादी धरणातून पाण्याच्या विसर्गामुळे पूर परिस्थितीत अधिकच भर पडली. पण पुराचे पाणी शेतात शिरल्याने धान पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यामुळे धान उत्पादक हवालदिल झाला आहे. खासदार प्रफुल्ल पटेल, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव विजया ठाकरे नंदूरकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) चे जिल्हा महासचिव कैलास गेडाम यांनी नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट मदत देण्यात यावी. तथा पीक विम्याचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी केली आहे. १३ सप्टेंबर पासून पूर परिस्थिती निवळली असून परिस्थिती हळुहळु पूर्व पदावर येत असल्यामुळे जनतेसह गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या