Ticker

6/recent/ticker-posts

एस.टी. प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधून १.६१ लाखांची चोरी

बार्शी बसस्थानकावर अज्ञात चोरट्याचा हात; पोलिसांत गुन्हा दाखल

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर : साखरपुडा कार्यक्रमासाठी प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून तब्बल १ लाख ६१ हजार ३०० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित महिला १३ मे २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास लातूर एक्सप्रेसने प्रवास करून बार्शी येथे सकाळी ५ वाजता उतरल्या. त्या आपल्या नातेवाइकाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी धाराशिव येथे जाण्यासाठी बार्शीहून धाराशिवकडे जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये सकाळी ५.१५ वाजता बसल्या. प्रवासादरम्यान गर्दी असल्याने त्यांनी आपले चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत ₹१,६०,०००/-) आणि ₹१,३००/- रोख रक्कम पर्समध्ये ठेवली होती.

धाराशिव येथे पोहोचल्यावर कार्यक्रमात वापरण्यासाठी मंगळसूत्र शोधले असता, ते आणि पाँकीटमधील रक्कम गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र वस्तू मिळून आल्या नाहीत. त्यामुळे बार्शी स्थानकावर बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम लंपास केल्याची शक्यता महिलेने पोलीसांत व्यक्त केली आहे.

याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 506/2025, भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक घाडगे (H.C./193) करीत आहेत.

गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना मौल्यवान वस्तू व रोख रक्कम सुरक्षित ठेवाव्यात. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या