१२ लाखांचा मुद्देमाल जप्त एकाला अटक
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : वरोरा तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाकेबाज कारवाई करत स्कॉर्पिओ वाहनातून बनावट देशी दारूची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला अटक केली. या कारवाईत सुमारे १२ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बोर्डा ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील प्रशांत ताजने यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेजवळ सापळा रचला.
या ठिकाणी एमएच-३४-सीडी-३३३६ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी संशयास्पद स्थितीत आढळली.
वाहनाची तपासणी केली असता, गाडीत ५० खाकी रंगाच्या खोक्यांमध्ये ‘रॉकेट देशी दारू संत्रा’ ब्रँडच्या ९० एमएल क्षमतेच्या सुमारे ५००० सीलबंद बाटल्या आढळून आल्या. प्रत्येकी ४० रुपयांच्या एमआरपीप्रमाणे या दारूची किंमत २ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय स्कॉर्पिओ वाहन (सुमारे ९ लाख रुपये), दोन मोबाईल फोन आणि दोन नंबर प्लेट असा एकूण १२.१९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आशीष रमेश पीटपल्लोवार (वय २३, रा. बोर्डा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर याला ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या दारूचा साठा प्रथमदर्शनी बनावट असल्याचे दिसून आल्याने रासायनिक तपासणीसाठी नमुने घेऊन सरकारी सील करण्यात आले.
सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५(जे)(ई), ८१, ८३, १०३ तसेच भारतीय न्याय संहितेचे कलम १२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक सचिनकुमार एच. पोलेवार करीत आहे.


0 टिप्पण्या