Ticker

6/recent/ticker-posts

भारत माझा देश आहे...




भारत माझा देश आहे...
             
                 रोखठोक -- रवि भोंगाने 

असं म्हटलं जाते की समाजकारणातून राजकारण, राजकारणातून समाजकारण आणि त्यातून खऱ्या अर्थाने समाजसेवा. मात्र ही त्रिसूत्री आता कालबाह्य होऊ लागली आहे का ? हा मन सुन्न करणारा प्रश्न तसाच सतावणारा देखील आहे. मृत्यूला गरीब श्रीमंती नसते. यमराज ते बघूनही येत नाही. परंतु आकस्मिक घटना संदर्भात प्रत्येकाची संवेदना जागृत होणे आवश्यक असते. उमरझरी आणि बांपेवाडा येथील प्रकरणात ज्या प्रकारे राजकारण खळखळून, भरभरून, उफाळून आले त्यात संवेदना किती आणि राजकारण किती याची चिरफाड करणे आता आवश्यक ठरते.  पैदीमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये तेलगु भाषेत रचलेली प्रतिज्ञाची आज आठवण करून देणे आवश्यक आहे. " भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे."  ही प्रतिज्ञा सर्वांनाच माहित आहे. मात्र ज्या राजकारणातून जी संवेदना उमरझरी, बांपेवाडा, आमगाव ( बु.) प्रकरणात उभारी देणारी ठरली ती वीरसी प्रकरणात का नाही ? बिबटच्या हल्ल्यामध्ये ठार होणारी मृतक ही परप्रांतीय कुटुंबातील होती म्हणून ? या प्रकरणातील मृतुकाचे कुटुंब हे येथील मुख्य निवासी नव्हते म्हणून? तो परिवार आपल्या क्षेत्रातील मतदार नव्हता म्हणून ? की संजय कापगते यांच्या मालकीची विटाभट्टी आपल्या गावातील आहे म्हणून ? याच संजय कापगते यांच्या मालकीच्या विटा भट्टीत आपल्याच गावातील, आपल्या जातीची, आपल्या समाजाची मुलगी किंवा कुटुंब असते आणि ही घटना घडली असती तर खरंच वीरसीचे नागरिक किंवा त्या परिसरातील जनसागर खरंच गप्प बसले असते काय ? गावाच्या बाबतीत आणि जातीच्या बाबतीत संवेदना प्रकट करणारे राजकारण या ठिकाणी मांडलिक कसे काय झालेत ?  उलट गावातल्या लोकांनी विटाभट्टी मालकाकडून परप्रांतीय कुटुंबाला लाखो रुपयाचे सानुगृह मदत देऊन राजकारणातल्या नेत्यांसोबत फोटो काढून प्रसिद्ध माध्यमाला पाठवायला पाहिजे होते तर निश्चित ही बाब स्वागताहर्त झाली असती. मात्र एकाच तालुक्यात एकाच प्रकारची घटना झाली असताना जिल्हा परिषद क्षेत्र,पंचायत समिती क्षेत्र, ग्रामपंचायत भर उन्हाळ्यात का गारठली? खरंच भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा म्हणण्याचा अधिकार विरसीच्या नागरिकांनी गमावला काय ? हा प्रश्न आता गावकऱ्यांनी आणि त्या गावातील राजकीय विचारसरणी स्वतःच्या अंतर्मनाला विचारून घ्यावे. नंतरच " सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा " म्हणण्याची धमक दाखवावी. एका परप्रांतीय कुटुंबाच्या बाबतीत, मृतकाच्या बाबतीत गावातील राजकारण दगड बनत असेल तर राजकारणात उतरायचा नैतिक अधिकार परिसरातील नागरिकांनी गमावला असे म्हणायला हरकत नाही. जी संवेदना उमरझरी, बांपेवाडा, आमगाव ( बु.)  येथे जर प्रकट होऊ शकते तर परप्रांतीय कुटुंबच्या बाबतीत का नाही ?  उमरझरी, बांपेवाडा आमगाव (बु.) येथील हे कुटुंब आमच्या ओळखीचे होते म्हणून ? आमचे मतदार होते म्हणून ?आमच्या मतदार क्षेत्रातील नागरिक होते म्हणून ? की आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत म्हणून ?
वीरसी येथील संजय कापगते याच्या मालकीच्या विटाभट्टीवर  आपल्या जातीची, समाजाची, गावातील किंवा परप्रांतीय सोडून जर हे  कुटुंब असते आणि अशी घटना घडली असती तर खरंच वीरसीचेच नव्हे तर तालुक्यातील राजकारण गप्प बसले असते काय ?  याचे उत्तर निश्चितपणे कुणी देऊ शकेल?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या