रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली: शेकडो वर्षांचा रंजक इतिहास. इंग्रज कालीन काळ आणि त्याकाळची पिढी. याचे साक्षीदार म्हणून दोन वास्तू सध्या गणेश वार्डात अस्तित्वात आहेत. त्यात पुरातन गणेश मंदिर आणि माजी जनपतकालीन शाळा म्हणजे आजची जिल्हा परिषद शाळा. या दोन वास्तू गणेश वार्डातील महत्त्वपूर्ण साक्षीदार आहेत. शेकडो वर्षापासून अस्तित्वात असलेल्या गणेश मंदिराचे नवीन बांधकाम आता पूर्वत्वाकडे येत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिने हिंदू संस्कृतीत धार्मिक सण उत्सवाचे असतात. गुरुपौर्णिमा नंतर या सण उत्सवाची सुरुवात होत असते. त्यात सप्टेंबर महिना म्हटला की हमखास गणेशोत्सव असतो. कारण गणेशोत्सव हा सप्टेंबर महिन्यातच येत असतो. त्यामुळे येत्या काळात गणेश भाविकांना नव्या बांधकाम करण्यात आलेल्या गणेश मंदिराचे दर्शन व्हावे याकरिता गणेश मंडळाची बांधकाम समिती युद्ध स्तरावर राबत आहे. काही महिन्यांपासून सुरू झालेल्या या मंदिराच्या कामाला तांत्रिक कारणामुळे सुरुवातीला अडचण आलेली होती. परंतु श्री गणेशानेच यातून मार्ग काढला आणि बांधकामाला सुरुवात झाली. तेव्हापासून ते बांधकाम सातत्याने सुरू आहे. शेवटी हे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून गणेश भक्तांना यावेळी नव्या गणेश मंदिराच्या नवीन इमारतीचे दर्शन होणार आहे.
यंदाचा श्री गणेशोत्सव हा नवनिर्मित मंदिरासह श्री बाल गणेश उत्सव मंडळ मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहे. हे नवनिर्मित मंदिर राजस्थानवरून आलेल्या नक्षीकाम व आकर्षक कोरीव कामानी उभे होत आहे. या मंदिर निर्माण कार्यात श्री बाल गणेश उत्सव मंडळाचे सर्व सदस्य, गणेश वार्डातील निवासी मोठ्या भक्तीभावे बांधकाम कार्यात दररोज हातभार लावीत आहेत. ऑगस्ट महिन्यात हे मंदिर भव्य दिव्य रूपात उभे राहणार आहे. १४ सप्टेंबर २०२६ म्हणजे श्री गणेश चतुर्थीला गणेश मंदिर चौकात जल्लोषात श्री गणेश मूर्तीचे महापूजन व श्री गणेश मंडळच्यावतीने श्री गणेश मूर्तीची स्थापना केली जाईल.


0 टिप्पण्या