बोदरा, साकोली, सुंदरी
रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:- सध्या पावसाळा सुरू आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे. मात्र तालुक्यातील तलाव भरत आल्याने कमजोर तलाव पाळीला धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात काल-परवा सुंदरी येथील तलाव पाळ फुटल्याने तालुक्याने सलग हॅट्रिक्स साधली. असे असले तरी या तलावांच्या पाण्यावर ज्यांचा उदरनिर्वाह आहे त्यांचा नुकसान भरपाईचा प्रश्न नेहमी करिता प्रलंबित राहिलेला आहे. पहिल्यांदा बोदरा या गावातील तलाव पाळ फुटलेली होती. यामध्ये कोळी म्हणजे ( धीवर ) समाजाचे मत्स्यव्यवसायिक नुकसान तर झालेच पण त्या तलावाचे पाणी साकोली पर्यंत आल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झालेले होते. त्यावेळी पंचनामे करण्यात आलेले होते. मागील वर्षी साकोली येथील मालगुजारी तलावाची पाळ फुटलेली होती. बोदरा तलावासारखी परिस्थिती साकोलीच्या नागरिकांची झाली होती हे विशेष. येथेही पंचनामे झाले होते. आता सुंदरी येथील २८/७/२६ रोजी तलावाची पाळ फुटली. येथेही पंचनामे झाले.
______________________________________________
तलाव फुटतात, बातम्या येतात, शांत राहतात...
साकोली तालुक्यात सुंदरीच्या तलावाने हॅट्रिक साधली याची बातमी झाली. साकोली आणि बोदरा तलावाचीही बातमी आलेली होती. त्या अगोदर वडेगाव ( खांबा ) परिसरातील एका तलावाची पाळ फुटलेली होती. विशेष म्हणजे या सर्वांच्याच बातम्या झाल्यात. प्रसिद्धी माध्यमात फुटलेल्या तलाव पाळीच्या निमित्याने सर्वपक्षीय राजकीय प्रतिनिधी भेटून नागरिकांचे भर पावसाळ्यात तापलेले मन शांत करतात. नुकसान भरपाईची भरघोस मदत देऊ अशे आश्वासनही देतात आणि निघून जातात. मात्र त्यानंतर एक छदामही तलाव पाळ फुटल्यामुळे नुकसान भरपाई मिळाल्याचे दिसून येत नाही. अश्यावेळी सर्वपक्षीने नेते आपआपल्या सोयीने भेट देऊन जातात. आश्वासनाचे ढोल वाजवून जातात. दिवस पालटले की पक्षीय नेते, त्यांचे ढोल आणि त्यांचा आवाज नंतर कुठेच दिसून येत नसल्याचे दिसून येते. मागील वर्षी साकोलीमध्ये तलावाची पाळ फुटली. वर्ष उलटून जात आहे ना कोळी ( धीवर ) समाजाला मदत मिळाली ना ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना. तलावांचा श्रीमंत भंडारा जिल्हा. तलावांचा गर्भ श्रीमंत साकोली तालुका. तालुक्यातील तलावाचे पाणी शेतकऱ्यांचा श्वास आहे तर मत्स्य व्यवसाय करणाऱ्या कोळी समाजासाठी जीवन. तलावाच्या पाण्यावर कोळी ( धीवर) समाज मत्स्यव्यवसाय करीत असतो. त्यांच्या कुटुंबाची जीवनप्रणाली याच व्यवसायावर आहे. मात्र तलाव फुटल्यावर कुठल्याही परिस्थितीत जे नुकसान होते त्याची भरपाई कोळी समाज काढू शकत नाही. त्यामुळे ही नुकसान भरपाई शासनाकडून अपेक्षित असते. पावसाळा सुरू आहे. यानंतर अनेक तलाव तुडुंब भरणार आहेत. अनेक तलावांकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने तलाव पाळ कमजोर झालेल्या आहेत. तलाव खोलीकरण करून तलाव पाळीवर माती टाकणे गरजेचे असते. ज्यामुळे तलाव पाळ दिवसेंदिवस मजबूत होत असते. मात्र अनेक ठिकाणी तलावाचे खोलीकरण करून तलावातील मातीचा व्यवसाय करण्यात येतो. तर काही ठिकाणी तलावांचे खोलीकरणच केले जात नाही. परिणामी दिवसेंदिवस तलावाची पाळ फुटण्याच्या शक्यता अधिक अधिक निर्माण झालल्या आहेत.


0 टिप्पण्या