चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-जिल्ह्यातील प्रमुख भंडारा बसस्थानकावर गेल्या २७ वर्षांपासून प्रवाशांची तहान भागवणारा "संत लहरी बाबा जल-आशीष" हा पिण्याच्या पाण्याचा उपक्रम आज बंद अवस्थेत आहे. एसटी महामंडळाच्या उदासीनतेमुळे आणि समन्वयाच्या अभावामुळे समाजसेवेचे हे प्रतीक आता केवळ एक आठवण बनून राहिले आहे.
समाजसेवक श्री गोपीचंद बलवानी यांनी २९ मार्च १९९८ रोजी आपल्या आई-वडिलांच्या स्व. गजनमल बलवानी व स्व. पार्वतीदेवी बलवानी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वतःच्या खर्चातून या पिण्याच्या पाण्याच्या केंद्राची उभारणी केली होती. तत्कालीन नागपूर विभागीय नियंत्रक श्री वाय. एच. दीक्षित यांच्या उपस्थितीत संत श्री लहरी बाबा यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. बसस्थानकाच्या उभारणीच्या वेळीच जनसेवेच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या जल-आशीष केंद्रासाठी एसटी प्रशासनाचा एकही रुपया खर्च झाला नव्हता. त्याची देखभाल तसेच पाणीपुरवठ्याचा संपूर्ण खर्च बलवानी कुटुंबाकडून केला जात होता.
दररोज सुमारे १ लाख लिटर शीतल पिण्याचे पाणी या केंद्रातून प्रवासी, गरीब, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिले जात होते. वरच्या आणि खालच्या अशा दोन मोठ्या साठवण टाक्यांद्वारे हा उपक्रम २४ तास सुरू असायचा.
मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता एसटी महामंडळाने हे केंद्र बंद करून स्वतःची "नाथ-जल" योजना सुरू केली. मार्च २०२६ पासून पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली, मात्र त्याकडे कोणतेही लक्ष देण्यात आले नाही.
गोपीचंद बलवानी यांनी आपली व्यथा व्यक्त करताना सांगितले की, "९ मार्च २०२५ रोजी अंतर्गत रस्त्याच्या बांधकामादरम्यान टाकीच्या परिसरात माती व बांधकाम साहित्याचा ढिगारा टाकण्यात आला. प्याऊजवळील झाडे आणि कुंड्याही हटविण्यात आल्या. आता एसटी प्रशासन हे केंद्र अनधिकृत असल्याचे सांगत आहे. प्रवाशांना गढूळ व गाळयुक्त पाणी देण्यापेक्षा आम्ही स्वतःहून ते बंद ठेवणेच योग्य समजले."
आज या जल-आशीष केंद्राच्या बंद पडल्यामुळे बसस्थानकावर येणारे हजारो प्रवासी शीतल पिण्याच्या पाण्यापासून वंचित झाले आहेत. जनसेवेला प्रोत्साहन देण्याऐवजी प्रशासन अडथळा का निर्माण करत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रवाशांची तहान भागवणारा 'संत लहरी बाबा जल-आशीष' हा उपक्रम आता कायमचा इतिहासजमा होणार की पुन्हा सुरू होणार, याचे उत्तर येणारा काळच देईल.


0 टिप्पण्या