Ticker

6/recent/ticker-posts

वाढदिवसाचा केक तलवारीने कापणे पडले महागात!

सोशल मीडियावर स्टंटबाजी; दोन्ही तरुणांना पोलिस कोठडी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
वरोरा : वाढदिवसाच्या पार्टीत तलवारीने केक कापून त्याचा व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटस व इंस्टाग्रामवर टाकणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या दोघांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत अटक केली आहे. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 जुलै 2026 रोजी शेगाव (बु.) येथील रहिवासी प्रणय लोंणकर याचा वाढदिवस होता. या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रणयने मित्रांसह गावातच पार्टीचे आयोजन केले होते.  
उत्साहाच्या भरात कायद्याचे भान विसरून त्यांनी केक कापण्यासाठी थेट धारदार लोखंडी तलवारीचा वापर केला. एवढेच नव्हे तर तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओ तयार करून तो स्वतःच्या मोबाईल स्टेटसवर आणि इंस्टाग्रामवर शेअर केला.
  
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली. गुन्हे शाखेने 10 जुलै 2026 रोजी शेगाव येथे छापा टाकला.  
या कारवाईत पोलिसांनी सर्वात आधी चेतन राजू ढोले (वय 24, रा. शेगाव बु., ता. वरोरा) याला ताब्यात घेतले. पार्टीसाठी तलवार आणून देणारा चेतन ढोले हा मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 3 हजार रुपये किमतीची बेकायदेशीर धारदार लोखंडी तलवार जप्त केली. ज्याचा वाढदिवस होता तो प्रणय लोणकर (रा. शेगाव, ता. वरोरा) हा सुरुवातीला फरार झाला होता. मात्र LGB शाखेने कसून शोध घेऊन रविवारी सायंकाळी त्यालाही अटक केली.

या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन शेगाव येथे अपराध क्रमांक 225/26, कलम 4, 25 भारतीय शस्त्र अधिनियम सहकलम 3(5) व भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.  
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेशसिंग यादव यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

"वाढदिवसाची पार्टी अंगावर आली" अशी अवस्था या तरुणांची झाली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात थेट जेलची वारी करण्याची वेळ आली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या आणि स्टंटबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

________________________________________

तलवारीने केक कापला अन् गेले जेलमध्ये!

वरोरा शेगाव - वाढदिवसाला स्टंट. तलवारीने केक कापून व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. LGB चंद्रपूरची कारवाई. चेतन ढोले व प्रणय लोंगकर अटक. 3 हजाराची तलवार जप्त. BNS + शस्त्र कायद्याने गुन्हा. पोलिसांचा इशारा - स्टंटबाजी महागात पडेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या