सर्वपक्षीय एकजूट व्यापारी, शाळा-महाविद्यालयांनी सहकार्य करण्याचे आवाहन
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर साकोली येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत, लोकशाही मार्गाने आवाज उठविणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे ही लोकशाही मूल्यांवर गदा आणणारी घटना असल्याचा संतप्त सूर बैठकीत उमटला.
उद्याचा साकोली बंद शांततामय, शिस्तबद्ध आणि व्यापक स्वरूपात यशस्वी व्हावा, यासाठी व्यापारी, व्यावसायिक, शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने दडपशाहीऐवजी संवादाच्या माध्यमातून पाहावे, अन्यथा जनतेचा रोष अधिक तीव्र होईल, अशी भूमिकाही बैठकीत मांडण्यात आली.
बैठकीत बंदच्या नियोजनासह कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पाडण्यावर भर देण्यात आला. समाजातील सर्व घटकांनी पक्षभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ एकजूट दाखवावी, असे आवाहन उपस्थितांनी केले.
या बैठकीस शिवकुमार गणवीर, कैलास गेडाम, अशोक कापगते, अचल मेश्राम, डी. जी. रंगारी, किशोर चन्ने, विलास मेश्राम, बिट्टू गजभिये, प्रमोद मेश्राम, शैलेश गणवीर, दादू बडोले, तनुजा नागदेव, प्रमिला टेंभुरकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी साकोली बंदला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले.


0 टिप्पण्या