नेरपिंगळाई : माझं गाव आरोग्य संपन्न गाव मोहिमेअंतर्गत आज दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरपिंगळाई अंतर्गत उपकेंद्र नेरपिंगळाई व हत्तीरोग कार्यालय नेरपिंगळाई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हत्तीरोग दिन विविध आरोग्यविषयक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी गावातील गप्पी मासे पैदास केंद्र तसेच डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, नेरपिंगळाई येथे आरोग्य जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एन. जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना हत्तीरोग प्रतिबंध, कीटकजन्य आजारांपासून बचाव, परिसर स्वच्छतेचे महत्त्व, किशोरवयीन मुलींसाठी वैयक्तिक स्वच्छता व पोषण आहार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पावसाळ्यात घ्यावयाची आरोग्याची काळजी याबाबतही माहिती देण्यात आली.
यावेळी पिण्याच्या पाण्याची O.T. टेस्ट घेण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आढळून आल्याने पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम जयस्वाल, डॉ. जीवन ए. शिंदे, आरोग्य सहायिका श्रीमती ए. एम. जी. गिरी, आरोग्य सहाय्यक श्री बी. पी. गवई, आरोग्य सेविका श्रीमती प्रज्ञा तिजारे, आरोग्य सेवक श्री पी. एम. भालेराव, श्री निलेश भोसले, क्षेत्र कर्मचारी श्री एस. एल. कांबळे, श्री एन. टी. होणवलकर, आशा सुपरवायझर श्रीमती यू. पी. अमृते, आशा वर्कर श्रीमती एस. आर. मोतीखाये, तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमातून नागरिकांमध्ये हत्तीरोग व इतर कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती होऊन स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.


0 टिप्पण्या