धाडीनंतर बोगस डॉक्टर फरार; पोलिसांचा शोध सुरू
वरोरा / शेगाव प्रतिनिधी : होमराज घुमे
वरोरा : चार दिवसांपूर्वी शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील साखरा येथे गळफास घेतलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात गर्भपात करणारा बोगस डॉक्टर विश्वास याच्यावर शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच डॉ. विश्वास काल रात्री शेगावमधून फरार झाला असून पोलिसांचा त्याचा शोध सुरू आहे.
साखरा येथे मृत आढळलेल्या मयुरी दुपारे हिच्या कुटुंबीयांनी म्हणजेच वडील आणि बहिणींनी आरोप केला होता की, मयुरी व साखरा येथील महेश कावळे यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर महेशने तिच्यावर गर्भपातासाठी दबाव आणला होता.
कुटुंबीयांच्या विरोधानंतर महेशने मयुरीसोबत लग्न लावून घेतले. मात्र लग्नानंतर अवघ्या दोन दिवसातच शेगाव येथील डॉक्टर विश्वास यांच्याकडे तिचा गर्भपात केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.
या आरोपानंतर पोलीस विभाग शेगावचे पी.एस.आय. सुमित कांबळे, पो.कॉ. ज्ञानेश्वर केकान, आरोग्य विभाग वरोराचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, डॉ. रिजवाना परवीन, इन्चार्ज संतोष झाडे, डॉ. राजु बोबडे,अश्विनी गेडाम औषध विभाग अधिकारी, अशोक तुरारे तालुका अधिकारी, नायब तहसीलदार उल्हास लोखंडे यांच्या पथकाने काल सायंकाळी संबंधित बोगस डॉक्टर विश्वासच्या दवाखान्यावर धाड मारली.
या धाडीत अवैध औषध साठा, शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी शस्त्रे, मानवी उत्तेजना वाढवणारे प्रतिबंधित औषध साठा जप्त करण्यात आला. याबत शेगाव पोलिसांना फिर्याद देण्यात आली व पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली.
चौकशी सुरू असताना डॉक्टर विश्वास हा त्याच्या दवाखान्यातच हजर होता. मात्र पंचनामा पूर्ण होताच तो तेथून पसार झाला. त्यावरून शेगाव पोलिसांनी डॉक्टर विश्वास याला फरारी घोषित करून पुढील चौकशी सुरू केली आहे.
डॉक्टर स्वतः पसार झाला की यामागे कोणाचा हात आहे, अशा उलट-सुलट चर्चांना शेगाव परिसरात उधाण आले आहे. शेगाव पोलीस या प्रकरणात कोणत्या दिशेने चक्र फिरवून कारवाई करतात, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
______________________________
शेगाव: गर्भपात प्रकरणातील बोगस डॉक्टर फरार
साखरा येथील मृत्यू प्रकरणात डॉ. विश्वासवर गुन्हा. आरोग्य पथकासह धाड, अवैध औषधे व शस्त्रे जप्त. पंचनाम्यानंतर डॉक्टर पसार. पोलिसांचा शोध सुरू.


0 टिप्पण्या