चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-साकोली पंचायत समितीचे गट शिक्षणधिकारी सेवानिवृत्त झाल्यापासून शिक्षण विभागाचा भार प्रभारी खांद्यावर वाहने सुरु आहे. त्यामुळे नियमित गट शिक्षणधिकारी केव्हा मिळणार हा प्रश्न शिक्षण विभागाच्या वर्तुळात विशेषतः शिक्षकांमध्ये चर्चेला जात आहे. सविस्तर प्राप्त बातमीनुसार, साकोली पंचायत समिती ही महत्त्वाची पंचायत समिती मानली जाते. आमदार नाना पटोले यांच्या तालुक्यातील ही पंचायत समिती असल्याने, केवळ पंचायत समितीच नव्हे तर तालुक्यातील समस्त शासकीय विभागाला अनन्य साधारण महत्त्व आहे. दोन वर्षांपूर्वी साकोली पंचायत समितीचे गट शिक्षणधिकारी कोरे हे नियतमानानुसार आणि शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांच्या ठिकाणी मोहाडी पंचायत समितीचे गट शिक्षणधिकारी विजय आदमने हे प्रतिनियुतीवर साकोली पंचायत समिती येथे गट शिक्षणधिकारी म्हणून ठिकाणी रुजू झाले. सलग दोन वर्ष त्यांनी साकोली पंचायत समितीचा कार्यभार सांभाळला. मात्र मोहाडी पंचायत समिती आणि साकोली पंचायत समिती येथे आदमने अवागमन करीत असल्याने मोहाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला अडचणी येऊ लागल्यात. त्यामुळे पंचायत समिती मोहाडी यांनी ठराव घेऊन आदमने यांच्या परतीची मागणी भंडारा शिक्षण अधिकारी यांना केली. भंडारा शिक्षणधिकारी यांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन त्यांना परतीचे आदेश दिले. त्यानंतर लाखनी येथील गट शिक्षणधिकारी सुभाष बावनकुळे यांच्याकडे साकोली शिक्षण विभागाचा प्रभारा सोपविण्यात आला. त्यामुळे पुन्हा साकोली शिक्षण विभागाला प्रभारी खांद्यावरच ओझे वाहवे लागत आहे. विशेष म्हणजे प्रभारी गट शिक्षणाधिकारी आलेले सुभाष बावनकुळे या आधी साकोली पंचायत समिती येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे साकोली पंचायत समिती शिक्षण विभागाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. परिणामी शिक्षण विभागाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची शक्यता वर्तवली जात आहे.


0 टिप्पण्या