Ticker

6/recent/ticker-posts

अखेर साकोली-नागझिरा अभयारण्य रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात

 रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:- आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे.' नाक दाबले की तोंड उघडते ' असला मुर्दाड प्रकार शासकीय यंत्रणेच्या बाबतीत क्वचितच दिसून येतो. मात्र वृत्तपत्राच्या बातम्यांनी या यंत्रणेचे चांगलेच डोळे उघडले असून वृत्तपत्राच्या बातमीची दखल घेत काल ८ जुलै २०२६ रोजी  बांधकाम विभाग तर्फे रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या रस्त्यावर अनेकांना अपघातांना सामोरे जावे लागल्यानंतर. अनेकांना आपली कंबर तोडून घेतल्यानंतर. आपल्या वाहनाचे नुकसान केल्यानंतर आणि प्रसिद्धी माध्यमांनी सुस्तावलेल्या यंत्रेची झोप उडवल्यानंतर यंत्रणा जागी झाली. विशेष म्हणजे चित्रा न्यूज ने " साकोली-नागझिरा रस्ता दुरुस्तीकरिता विद्यार्थी उतरणार रस्त्यावर, अनेक विद्यार्थ्यांसह पालक जखमी " या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. सविस्तर बातमी अशी की, साकोली-नागझिरा व्याघ्र प्रकल्प रस्ता काही दिवसांपासून अपघातग्रस्त प्रवण स्थळ ठरलेले होते. अनेक दिवसांपासून या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांसह अनेक पालक जखमी झालेली होती. त्यामुळे या रस्त्याची त्वरित डागडूजी न झाल्यास रस्त्याच्या दुरुस्ती करिता पालकांसह विद्यार्थी, शिक्षक रस्त्यावर उतरण्याचा इशारा शाळा महाविद्यालयांनी दिलेला होता. सदर रस्ता ६ गावांशी जोडलेला असून या रस्त्यावर पालक शिक्षकांसह किमान ७ हजार विद्यार्थी रोज या रस्त्यावरून विद्यार्जनकरिता आवागमन करीत असतात. मात्र अनेक दिवसापासून प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत होते. सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढण्यासाठी आता विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागत असल्याने दिल्लीतील जंतर मंतरचे चित्र या रस्त्यावर काही दिवसात दिसल्यास नवल नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. पावसाळा सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्त्यांची अवदसा झालेली होती. या रस्त्यावर पडलेले खड्डे विद्यार्थी आणि पालकांसाठी जीवघेणे ठरू लागलेले होते. अनेक दिवसापासून हे खड्डे जीवघेणे ठरत असतांना याकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष होत होते. नागझिरा व्याघ्र प्रकल्प अभयारण्य हा साकोलीतील सर्वाधिक रहदारीचा रस्ता आहे. जमनापूर, पिटेझरी, वडेगाव, खांबा, जांभळी, तुडमापुरी ही मुख्य गावे साकोलीतील प्रमुख रस्त्याशी जोडलेली आहेत. सदर गावातील नागरिक या मुख्य रस्त्याने तालुक्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी रोज येत असतात. विशेष म्हणजे या रस्त्यावर व्यावसायिक दुकानांसह शाळा, महाविद्यालय परिसर आहे. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असताना सुद्धा शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केलेले होते. या खड्ड्यातून सर्वांना आपली वाहने काढावी लागत होती. खड्ड्यात पाणी भरल्यावर खड्डा दिसून येत नव्हता. त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळत होती. या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात होत होते. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षक जखमी झालेले होते तर वाहनांचे छोटे मोठे नुकसान होत होते. 
______________________________________________

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हा महासचिव कैलास गेडाम, पालक आणि प्रसिद्ध कलावंत भावेश कोटांगले, या रस्त्यावरून नेहमी अवागमन करणारे फॅशन शूजचे संचालक ताराचंद क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ता लीलाधर पटले, कुणाल टी सेंटरचे संचालक कुणाल तिडके यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे या रस्त्या संदर्भात संतापी प्रतीकिया व्यक्त करून शासकीय यंत्रणेवर निशाणा साधलेला होता. अखेर उशिरा का होईना या यंत्रेला जाग येऊन रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. यामुळे शेकडो पालकांनी समाधान व्यक्त करून प्रसिद्धी माध्यमांचे आभार मानले.
----------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या