° ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे गैरहजर, पिण्याचे पाणीही ठेवले नाही - ग्रामस्थांचा आरोप
प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर
चंद्रपूर : :राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सुब्बई गावात झालेल्या ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सरपंच सुरेखा सुधाकर आत्राम यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांवर ठराव क्रमांक 16 अन्वये अविश्वास ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
दि. 20 ऑगस्ट 2026 रोजी सुब्बई येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेची माहिती केवळ एक दिवस अगोदर दवंडी देऊन देण्यात आली होती. तरीही गावाच्या विकासासाठी 400 हून अधिक ग्रामस्थ, महिला आणि युवा मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
उपस्थित लोकांची गर्दी पाहून सरपंच सुरेखा सुधाकर आत्राम यांनी सभा रद्द करण्यात आली असे सांगून सभा घेण्याचे टाळले. ग्रामस्थांनी आपली रोजी बुडवून सभेसाठी हजेरी लावली होती, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले. हे पाहून उपस्थित युवकांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामसभा झालीच पाहिजे अशी मागणी लावून धरली. अखेर दबावापुढे सरपंचांना ग्रामसभेत उपस्थिती लावावी लागली.
ग्रामस्थांच्या मते, ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून गेल्या 4 वर्षात सरपंच म्हणून पदभार स्वीकारूनही एकही महिला ग्रामसभा घेण्यात आली नाही. ग्रामसभेत पिण्याचे पाणी सुद्धा ठेवण्यात आले नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
ग्रामसभेत युवकांनी थेट सरपंच सुरेखा आत्राम व सर्व सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर सरपंचांनी "राजीनामा देणार नाही, परंतु सर्व गावकऱ्यांची माफी मागतो," असे उत्तर दिले. मात्र ग्रामस्थ राजीनाम्यावरच ठाम राहिले आणि अखेर सर्वानुमते अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
या संदर्भात ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता, "आमच्या ग्रामसेवकांचे आंदोलन सुरू असल्यामुळे आम्ही ग्रामसभेत बसणार नाही. सरपंचांना अधिकार आहे, ते निर्णय घेऊ शकतात," असे अभिप्राय त्यांनी दिले.
जर येत्या 15 दिवसांत सरपंच सुरेखा सुधाकर आत्राम यांच्यासह सर्व सदस्यांना अपात्र केले नाही, तर प्रशासनाविरोधात गावातील सर्व नागरिक, महिला, पुरुष आणि युवा मोठ्या संख्येने आंदोलन करणार असल्याचा इशारा युवकांनी दिला आहे.
गावाच्या हितासाठी युवकांनी उचललेल्या या पावलाचे समस्त गावकऱ्यांकडून अभिनंदन केले जात आहे.


0 टिप्पण्या