Ticker

6/recent/ticker-posts

योगामुळे निरोगी शरीर आणि प्रसन्न मन : सीमा नंदनवार

(संत निरंकारी महिला योग वर्गाचा ८ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात संपन्न)


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा : महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहावे, या उद्देशाने सुरू असलेल्या संत निरंकारी महिला योग वर्गाचा ८ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव श्रद्धा व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. महिला पतंजली योगाच्या अंतर्गत संचालित या योग वर्गात विविध धार्मिक व योगविषयक उपक्रमांसह गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात त्रिवार ओंकार, प्राणायाम, यज्ञ व हवनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका सौ. सीमा नंदनवार व सौ. प्रिया रावलानी उपस्थित होत्या.

कार्यक्रमात वर्गशिक्षिका अनिता खेडीकर यांनी महिला योग वर्ग सुरू करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “स्त्री ही राष्ट्राची आधारशक्ती आहे. तिचे शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे हे संपूर्ण कुटुंब व समाजासाठी महत्त्वाचे आहे. महिलांनी निरोगी व आनंदी जीवनासाठी नियमित योगासने व प्राणायाम आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा तसेच जीवनशैलीत सकारात्मक बदल करावेत.”

प्रमुख पाहुण्या सौ. सीमा नंदनवार यांनी सांगितले की, नियमित योगासने व प्राणायाम केल्याने शरीर निरोगी राहते तसेच मन प्रसन्न व आनंदी राहते. योगामुळे तणाव कमी होऊन जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

सौ. प्रिया रावलानी यांनी वाढत्या वयात शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी योग अत्यंत प्रभावी असल्याचे सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शरीरात स्फूर्ती टिकून राहते तसेच मानसिक प्रसन्नताही लाभते.

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूची महती वर्णन करणाऱ्या भक्तिमय भजनांचे भावपूर्ण सादरीकरण करण्यात आले. उपस्थित साधिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गुरुपौर्णिमा उत्सवाचा आध्यात्मिक आनंद अनुभवला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. सारिका मानकानी, सौ. सुनीता किते तसेच योग वर्गातील सर्व साधिकांनी विशेष सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या