९० हजार रूपये लाच घेणा-या सुभाष मारणार यांची उचलबांगडी!
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार : नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये एकाच टेबलावर सलग १५ ते २० वर्षे चिपकून बसणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अखेर सीईओ सावनकुमार यांनी बदल्या केल्या आहेत.काही कर्मचारी हे बदल्यांचे आदेश देणे,बीले मंजूर करणे इत्यादी कामांसाठी लोकांकडून लाखों रूपये उकडत होते. पैसे गोळा करण्याचे काम करत होते.सुभाष मारणार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी बाजीराव शिंदे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानगीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्याकडून आंतरजिल्हा बदलीने नंदुरबार ते सोलापूर जाण्यासाठी सीईओच्या सहीची एनओसी देण्यासाठी तब्बल ९० हजार रूपये घेतल्याचा शिक्षकांच्या संभाषणाचा विडीओ सोशल मिडीयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता.त्यामुळे जिल्हा परिषद नंदूरबार मध्ये मोठी खळबळ उडाली होती.सुभाष मारणार हे गेल्या १३ वर्षांपासून जिल्हा परिषद नंदूरबारच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर एकाच टेबलावर चिपकून बसले होते. अखेर त्यांची शिक्षण विभागातून पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे.तसेच सुनील नथा पाटील हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगळपाडा तालुका नवापूर शाळेतील शिक्षक गेल्या १२ वर्षापासून जिल्हा परिषद नंदूरबारच्या पाणीपुरवठा विभागात एकाच टेबलवर चिपकून बसला होता.
दर ३ वर्षांनी कर्मचाऱ्यांची बदली करावी लागते,असा शासन निर्णय असतांना १५ वर्षे एकाच टेबलावर असणाऱ्यांची सीईओ बदली का करत नाहीत? सीईओ यांना त्यांचा काही फायदा होतो का? की पुढा-यांचा दबाव सीईओ वर आहे,म्हणून अशांची बदली करत नाहीत, असे सवाल आदिवासी संघटनांनी उपस्थित करत थेट सीईओ वर आरोप केले होते.बिरसा फायटर्स संघटनेकडून निवेदन ही देण्यात आले होते.दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा परिषद नंदूरबार समोर आदिवासी संघटनांनी मोर्चाही नेला होता.कार्यवाही होत नाही म्हणून पुन्हा २७ मे २०२५ रोजी सीईओ यांना निवेदन दिले व मागणी केली.ज्यांची तुम्ही बदली करत नाहीत ते तुमचे नातेवाईक आहेत का? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? की तुमचा यांच्यामुळे फायदा होतो? असे प्रश्न उपस्थित करत ३ जून २०२५ रोजी जिल्हा परिषद नंदूरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते.बदल्या करत नसतील तर सीईओ ने आपले पद सोडावे,अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली होती.अखेर सीईओ सावनकुमार यांनी पुढा-यांच्या दबावाला बळी न पडता जिल्हा परिषद नंदूरबार मधील कर्मचाऱ्यांच्या बदली आदेश काढले आहेत, म्हणून सीईओ सावनकुमार यांचे आदिवासी संघटनांनी आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या