Ticker

6/recent/ticker-posts

सोशल मीडियामुळे 5 वर्षांपासून भटकणारी महिला कुटुंबाला परत मिळाली


 सर्वधर्म समभाव प्रभुसेवा संस्थेच्या प्रयत्नांना यश, आश्रमासाठी आवाहन

चंद्रपूर प्रतिनिधी : राजेश येसेकर

चंद्रपूर : समाजाने विसरलेल्या निराधार, अनाथ, बेवारस, मानसिक दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तींना माणुसकीची ऊब देण्याचे कार्य सर्वधर्म समभाव प्रभुसेवा संस्था, चंद्रपूर गेली दोन वर्षांपासून अविरतपणे करत आहे. _"मानवसेवा हीच ईश्वरसेवा"_ या ब्रीदवाक्यासह 08 जुलै 2024 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने जात-धर्म-भेद न मानता शेकडो गरजूंच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला आहे.

रस्त्यावर भटकणाऱ्या, कुटुंब नसलेल्या, आजारी आणि अपंग व्यक्तींना संस्था शोधून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेते. स्वच्छ अंघोळ, नवीन कपडे, पौष्टिक अन्न, पाणी आणि वैद्यकीय उपचार दिले जातात. गरज भासल्यास रुग्णालयात दाखल करून उपचारही केले जातात. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा शोध घेऊन पुनर्वसनाचा प्रयत्न केला जातो.

दि. 27 जुलै रोजी सोमवारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वरोरा, भद्रावती आणि पडोली येथे सेवा दिली. यावेळी भद्रावती शहराच्या मुख्य प्रवेशद्वार परिसरात अस्तव्यस्त केस, मळके-फाटके कपडे घातलेली एक महिला आढळली. 

संस्थेच्या टीमने तिची विचारपूस केली असता तिने आपले नाव साक्षी सुनील डोंगरे, रा. ता. दापोली, जि. रत्नागिरी असे सांगितले आणि "मला घरी जायचे आहे" अशी इच्छा व्यक्त केली. 

संस्थेने तात्काळ तिचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. ही माहिती तिच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचली. पोस्टवरील क्रमांकावरून सचिन नक्षिणे, भद्रावती यांच्याशी संपर्क साधून ही महिला आपली नातेवाईक असल्याचे सांगितले.

"ही महिला गेल्या पाच वर्षांपासून भटकत आहे. आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता पण मिळाली नव्हती. आम्ही आशाच सोडली होती. पण तुमच्या प्रयत्नांमुळे आज आम्हाला खूप आनंद झाला आहे," असे सांगून त्यांनी संस्थेचे आभार मानले. सोमवारी नातेवाईक तिला घेण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

संस्थेचे कार्य दिवसेंदिवस वाढत असल्याने आता कायमस्वरूपी निवाऱ्याची म्हणजेच आश्रमाची गरज भासू लागली आहे. यासाठी समाजातील दानशूर, सेवाभावी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष रमेश हनुमंते यांच्यासह संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थेला डॉक्टर, व्यापारी, पत्रकार आणि युवकांचे सहकार्य लाभत आहे.

_____________________________

सोशल मीडियाने जुळवला 5 वर्षांनी तुटलेला नातेसंबंध

सर्वधर्म समभाव प्रभुसेवा संस्थेने भद्रावतीत भटकणारी साक्षी डोंगरे रा. रत्नागिरी यांना शोधले. फोटो व्हायरल करताच 5 वर्षांपासून बेपत्ता असलेली महिला नातेवाईकांना मिळाली. "मानवसेवा हीच ईश्वरसेवा" या ब्रीदाने गेली 2 वर्षे संस्था निराधारांची सेवा करत आहे. कायमस्वरूपी आश्रमासाठी मदतीचे आवाहन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या