Ticker

6/recent/ticker-posts

श्रमिक वंचितांच्या महानायकांची जयंती उत्साहात संपन्न.

संयुक्त महाराष्ट्राचा बुलंद आवाज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना माहूर शहरात क्रांतिकारी अभिवादन!

भव्य मिरवणूक, नामफलकाचे अनावरण अन् लाल बावट्याच्या विचारांचा जागर.



 चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड :-पृथ्वी ही शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, ती नागाच्या फणावर तरलेली नाही," असा क्रांतिकारी विचार संपूर्ण जगाला देणारे साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल शनिवारी माहूर शहरात प्रचंड उत्साहात आणि भव्य दिव्य वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.
सायंकाळी साडेचार वाजता अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सरफराज दोसानी आणि पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज किर्तने यांच्या हस्ते साहित्यरत्नांच्या पूर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, आणि मिरवणुकीची सुरुवात करून देण्यात आली.त्यानंतर डी.जे.च्या निनादात आणि क्रांतीघोषात माहूर शहरातून भव्य मिरवणुकीला शिस्तीत सुरुवात झाली.
     या जयंती उत्सवाचे औचित्य साधून मातोश्री किराणा समोरील चौकाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक' असे नामकरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ऐतिहासिक नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मनोज किर्तने म्हणाले की,
माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जिवाची होतीया कायली.." या अविस्मरणीय विरह कवणातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला धार देणारे आणि 'फकिरा', 'वैजयंता' यांसारख्या अजरामर साहित्यातून श्रमिकांच्या, वंचितांच्या आणि उपेक्षित घटकांच्या वेदना जगासमोर मांडणारे अण्णाभाऊ हे खऱ्या अर्थाने लोकक्रांतीचे पुरस्कर्ते होते. शाहीर अमर शेख व शाहीर द.ना.गव्हाणकर यांच्या साथीने लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी शोषितांच्या मनात क्रांतीची ठिणगी पाडली.

त्यांनी पुढे अण्णाभाऊंच्या विचारांची आठवण करून देत, मनुवाद आणि भांडवलशाही हेच बहुजन-कष्टकऱ्यांचे खरे शत्रू आहेत" असा इशारा दिला आणि या दोन्ही प्रवृत्तींविरुद्ध एकजुटीने लढण्याचा खंबीर संकल्प उपस्थितांनी केला.
      जयंती उत्सव समिती आणि माहूर शहरातील युवा मंडळींनी या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत नेटके, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण नियोजन केले होते.
मिरवणूक शांततेत आणि नियोजित वेळेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
जयंती उत्सवाच्या शेवटी अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक क्रांतिकारी घोषणांनी संपूर्ण माहूर शहर दुमदुमून गेले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या