पुलावर 5 फूट पाणी, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पाण्याखाली
भद्रावती प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती : तालुक्यातील पिपरी (देशमुख) परिसरात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दि. 31 जुलै रोजी आलेल्या पुराचा फटका पिपरी, कोच्ची, मुरसा व घोनाड या गावांना बसला आहे. पुराच्या पाण्यामुळे पिपरी–कोच्ची–मुरसा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.
पिपरीहून कोच्ची-मुरसा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पुलावर तब्बल पाच फूट पाणी आल्याने नागरिकांना ये-जा करणे धोकादायक बनले आहे.
पिपरी व कोच्ची परिसरातील नाल्यांना आलेल्या पुरामुळे नदी-नाल्यालगतची शेती पूर्णतः पाण्याखाली गेली आहे. सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोच्ची–घोनाड परिसरातील नाल्यालाही पूर आल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट होण्याच्या भीतीने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
कोच्ची गावाच्या आजूबाजूला पुराचे पाणी साचल्याने गावाचा संपर्क जवळपास तुटला आहे. गावातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होत असली तरी परिसरात अद्याप मोठ्या प्रमाणात पाणी साचून आहे.
पिपरी येथील पोलीस पाटील यांच्याकडून प्रशासनाला वेळोवेळी पूरस्थितीची माहिती देण्यात येत आहे.पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर तातडीने पंचनामे करण्यात यावेत आणि बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रशासनाने केवळ पंचनामे करून थांबू नये, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल यासाठी कार्यवाही करावी," अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने गावाची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
________________________________
वर्धा नदीच्या पुराने भद्रावती तालुका विस्कळीत
वर्धा नदीच्या पुरामुळे पिपरी-कोच्ची-मुरसा मार्ग बंद. पुलावर 5 फूट पाणी, कोच्चीचा संपर्क तुटला. नदी-नाल्यालगतची सोयाबीन-कापूस पिके पाण्याखाली. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.


0 टिप्पण्या