झेडटीसीसी नागपूर कडून त्या कार्याचा गौरव म्हणून मुलगा सोपान निखाडे याचा केला सन्मान
चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी(श.प्र.):-"मरावे परी अवयव रुपी उरावे" ही म्हण भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील श्रीमती गोपिकाबाई रामेश्वर निखाडे यांनी कृतीतून खरी करून दाखवली.दुःखाच्या सर्वात मोठ्या प्रसंगातही त्यांच्या कुटुंबाने घेतलेल्या एका निर्णयाने 5 कुटुंबांच्या आयुष्यात नव्याने आशेचा किरण जागवला.ब्रेनडेड झाल्यानंतर गोपिकाबाईंच्या अवयवदानामुळे 1 लिव्हर, 2 किडनी आणि 2 डोळे गरजू रुग्णांना मिळाले. या महान त्यागाचा गौरव म्हणून विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र, झेडटीसीसी नागपूर तर्फे त्यांच्या कुटुंबाचा विशेष सन्मान सोहळा रविवार, दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4.00 वाजता वनमती हॉल, नागपूर येथे न्यायमूर्ती अनिल सत्यविजय किलोर मुंबई उच्च न्यायालय तसेच नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ स्थायी न्यायमूर्ती यांच्या उपस्थितीत संपन्न
झाला.माहितीनुसार, दि. 2 मार्च 2025 रोजी खैरी/पिंपळगाव ता. लाखनी येथील रहिवासी श्रीमती गोपिकाबाई निखाडे यांना प्रकृती बिघडल्याने एम्स हॉस्पिटल नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्या ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.या प्रसंगाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतु त्याच वेळी मुलगा सोपान रामेश्वर निखाडे यांनी मोठ्या धैर्याने अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळेच गोपिकाबाईंचे अवयव काढून गरजू रुग्णांना प्रत्यारोपित करण्यात आले.झेडटीसीसी च्या नोंदीनुसार, एका दात्यामुळे 1 लिव्हर, 2 किडनी आणि 2 डोळे अशा 5 रुग्णांना नवजीवन मिळाले आहे."एक सूर्यास्तने नव्या अनेक सूर्योदयांची चाहूल" असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र, झेडटीसीसी नागपूरने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, "आपल्या प्रियजनांच्या जाण्यानंतरही अवयवदानाचा निर्णय घेणे हा मोठा त्याग आहे. निखाडे कुटुंबाने दाखवलेली मानवता ही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या श्रेष्ठ कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित केला होता."एक सूर्यास्त... नव्या अनेक सूर्योदयांची चाहूल..." या ब्रीदप्रमाणे झालेल्या या कार्यक्रमाला अवयवदाता कुटुंबियांसह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
ग्रामीण भागातून प्रेरणा
सामान्यतः शहरात अवयवदानाबाबत जनजागृती दिसते. मात्र लाखनीसारख्या ग्रामीण भागातील कुटुंबाने घेतलेला हा निर्णय विशेष महत्त्वाचा आहे. सोपान निखाडे यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्येही अवयवदानाबाबत सकारात्मकता निर्माण होईल, असा विश्वास झेडटीसीसी नागपूरने व्यक्त केला आहे.या सन्मान सोहळ्यामागे केवळ गौरव करणे हाच उद्देश नाही, तर अधिकाधिक लोकांनी अवयवदानाचा संकल्प करावा यासाठी जनजागृती करणे हाही उद्देश होता. अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते, हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.
झेडटीसीसीने सर्व नागरिकांना दाता कुटुंबियांना बहुमूल्य आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे.


0 टिप्पण्या